जनतेच्या पैशांची उधळपट्टी कशाला? आमदार मंदा म्हात्रे यांचा सवाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2017 04:06 AM2017-09-28T04:06:01+5:302017-09-28T04:06:15+5:30
इंदूर शहरातील स्वच्छतेच्या उपक्रमांचा अभ्यास करण्यासाठी पुढील आठवड्यात नगरसेवकांचा दौरा आयोजित करण्यात आला आहे. या दौ-यासाठी जनतेच्या पैशांची उधळपट्टी कशाला, असा सवाल बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी उपस्थित केला आहे.
नवी मुंबई : इंदूर शहरातील स्वच्छतेच्या उपक्रमांचा अभ्यास करण्यासाठी पुढील आठवड्यात नगरसेवकांचा दौरा आयोजित करण्यात आला आहे. या दौ-यासाठी जनतेच्या पैशांची उधळपट्टी कशाला, असा सवाल बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी उपस्थित केला आहे. नगरसेवकांनी स्वखर्चातून स्वच्छतेचे धडे घ्यावेत, असा सल्लाही त्यांनी दिला आहे. यासंदर्भात त्यांनी महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांना बुधवारी एक निवेदन दिले असून, जनतेच्या पैशांतून आयोजित केलेला हा दौरा रद्द करण्याची मागणी केली आहे.
नवी मुंबई हे सुनियोजित व तितकेच स्वच्छ शहर आहे. गेल्या वर्षी देशातील आठव्या क्रमांकाचे स्वच्छ शहर म्हणून नवी मुंबईला मान मिळाला. ही वस्तुस्थिती लक्षात घेवून प्रत्येकाने स्वत:पासून स्वच्छतेची सवय लावली तर पहिला क्रमांक पटकवायला वेळ लागणार नाही. परंतु प्रशासनासह लोकप्रतिनिधींना स्वच्छतेचे वावडे असल्याचे दिसून येते. गणेशोत्सवाच्या काळात गावागावात फिरण्याचा योग आला. या दरम्यान, गाव-गावठाणातील स्वच्छतेचा बोजवारा उडाल्याचे पाहावयास मिळाले. प्रत्यक्ष आपली भेट घेवून ही बाब आपल्या निदर्शनास आणून दिली होती. त्यानंतर स्वच्छतेच्या कामाला युध्दपातळीवर सुरुवात करणे अपेक्षित होते. तसे झाले असते, तर अन्य शहराने राबविलेल्या स्वच्छताविषयक कामांची पाहणी करण्यासाठी लाखो रुपये खर्च करून दौरा आयोेजित करण्याची वेळ आली नसती, असा टोला मंदा म्हात्रे यांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनाद्वारे लगावला आहे. शहरात अनेक नागरी प्रश्न जैसे थे आहेत. रुग्णालयांत अत्यावश्यक सुविधांची कमतरता आहे. त्यामुळे खासगी रुग्णालयांची दुकानदारी तेजीत आहे. सर्वसामान्य रुग्णांची लूट होत आहे.
रस्ते व पदपथांची दुरवस्था झाली आहे. उद्यान व खेळाच्या मैदानांची दयनीय अवस्था झाली आहे. नागरिकांनी दिलेल्या कराच्या रकमेतून या सुविधांची पूर्तता होणे अपेक्षित असते. मात्र पाहणी दौºयाच्या नावाखाली जनतेच्या पैशांची उधळपट्टी करण्याचा घाट प्रशासन आणि सत्ताधाºयांनी घातल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
केवळ पामबीच मार्गाची पाहणी करून शहराला स्वच्छतेचा पुरस्कार मिळालेला नाही, याचे भान प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी बाळगायला हवे. प्रत्येक नगरसेवकाने आपल्या प्रभागाच्या स्वच्छतेची जबाबदारी घेतली तर हे शहर देशातच नव्हे, तर जगात पहिल्या क्रमांकाचे स्वच्छ शहर म्हणून नावारूपाला येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, जनतेच्या पैशांतून आयोजित केलेला हा अभ्यास दौरा अनाठायी व नागरिकांच्या पैशांची उधळपट्टी करणारा असल्याने तो रद्द करून हा निधी विकासकामांसाठी वापरावा, अशी मागणी मंदा म्हात्रे यांनी आयुक्तांकडे केली आहे. त्यामुळे ४ ते ६ आॅक्टोबर दरम्यान नियोजित करण्यात आलेल्या नगरसेवकांच्या इंदूर दौºयावर अनिश्चिततेचे सावट निर्माण झाले आहे.