पनवेल : नैना प्रकल्पाविरोधात पनवेलमध्ये गाव बंद आंदोलन सुरु झाले आहे. टप्प्याटप्प्याने 23 गावातील ग्रामस्थांनी गावबंद आंदोलन छेडले आहे. दि. 16 रोजी तालुक्यातील पळस्पे गावात गावबंद आंदोलन पुकारत गावातील सर्व व्यवहार बंद ठेवत सिडकोच्या नैना प्रकल्पाचा निषेध केला.
यावेळी स्थानिक शेतकऱ्यांनी सिडकोचा निषेध करत नैना हटावची घोषणाबाजी केली. बिन भांडवली व्यवसाय सिडको करीत आहे. दहा वर्ष झाले स्थानिकांना सिडको समजली नाही. ज्यांना निवडून दिले ते लोकप्रतिनिधी आवाज उठवत नसल्याची खंत यावेळी अनिल ढवळे यांनी व्यक्त केली. 23 गावे प्राथमिक स्वरूपात आंदोलनात उतरली आहेत. 260 गावांमध्ये हे आंदोलन छेडनार असल्याचे यावेळी आंदोलनकर्त्यांनी सांगितले.
सिडको पुर्वी 40 टक्के जागा घेणार होती. आत्ता 60 टक्के घेत आहेत. पुढे पुढे आणखी जागा घेऊन आपल्या जागेत शेतकरी भूमिहीन करण्याचा डाव सिडकोचा असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. यावेळी शेकापचे राजेश केणी,पळस्पेचे सरपंच चंद्रकांत भॊईर आदींसह ग्रामस्थ शेकडोंच्या संख्येने उपस्थित होते.