चारित्र्याच्या संशयावरून पत्नीवर वार
By Admin | Published: December 24, 2016 03:27 AM2016-12-24T03:27:35+5:302016-12-24T03:27:35+5:30
पत्नीचे बालपणीच्या मित्रासोबत प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरून पतीने तिचा गळा चिरून हत्येचा प्रयत्न केल्याची घटना
नवी मुंबई : पत्नीचे बालपणीच्या मित्रासोबत प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरून पतीने तिचा गळा चिरून हत्येचा प्रयत्न केल्याची घटना नेरूळमध्ये घडली आहे. याप्रकरणी ज्वेलर्स व्यावसायिक पतीला पोलिसांनी अटक केली आहे. पती- पत्नीतील वाद मिटवण्यासाठी नातेवाइकांची बैठक सुरू असताना हा प्रकार घडला.
सुधीरकुमार अक्राकरम (४०) असे नेरुळ पोलिसांनी अटक केलेल्या पतीचे नाव आहे. नेरुळ सेक्टर १८ येथील सागरदर्शन सोसायटीत राहणाऱ्या सुधीरकुमारचा सोन्याचा व्यवसाय आहे. त्याचे २००७ साली लग्न झाले असून तीन मुले आहेत. परंतु मागील काही दिवसांपासून त्याचा पत्नीच्या चारित्र्यावर संशय होता. पत्नीचे तिच्या बालपणीच्या मित्रासोबत प्रेमसंबंध असल्याचा त्याला संशय होता. यावरून त्यांच्यात सातत्याने वाद होत होते. अखेर दोघांमध्ये घटस्फोट घेण्यापर्यंत प्रकरण पोचले होते. परंतु पती-पत्नीतील वाद मिटून गैरसमज दूर व्हावेत अशी नातेवाइकांची भावना होती. यावरून गुरुवारी दोन्ही कुटुंबातील प्रमुख व्यक्तींची सुधीरकुमारच्याच घरी दिवसभर बैठक सुरू होती. अखेर रात्री चर्चेच्या अंती सुधीरकुमार याने पत्नीला खासगीत बोलण्याच्या बहाण्याने बेडरूममध्ये नेले. तिथे दोघांमध्ये काही वेळ चर्चा देखील झाली. परंतु थोड्या वेळातच सुधीरकुमारच्या पत्नीच्या ओरडण्याचा आवाज येवू लागल्यामुळे घरातल्या व्यक्तींनी तिच्या मदतीसाठी धाव घेतली. यावेळी ती रक्तबंबाळ अवस्थेत बेडरूममध्ये पडलेली होती. सुधीरकुमारने नारळ सोलायच्या धारदार हत्याराने तिच्या डोक्यात व गळ्यावर वार केलेले होते. अखेर उपस्थित नातेवाइकांनी तिला उपचारासाठी नेरूळच्या डी.वाय. पाटील रुग्णालयात दाखल केले. त्यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी सुधीरकुमार याला अटक केली असून त्याच्याविरोधात हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक राजपूत यांनी सांगितले. (प्रतिनिधी)