नवी मुंबई : घणसोलीमध्ये २५ ऑक्टोबरला दारू पिण्यासाठी पैसे न दिल्यामुळे पत्नीच्या डोक्यात हातोड्याने वार केले होते. गंभीर जखमी झालेल्या महिलेचा उपचारादरम्यान रुग्णालयात मृत्यू झाला होता. या प्रकरणी आरोपी राजू मेहरा याला बुधवारी बेलापूरमधून अटक केली आहे. घणसोली सेक्टर ४ मध्ये राहणाऱ्या राजू याने २५ ऑक्टोबरला मध्यरात्री पत्नी रत्ना मेहराबरोबर भांडण सुरू केले. दारूसाठी पैसे न दिल्यामुळे तिला शिवीगाळ करून मारहाण करण्यास सुरुवात केली.
झोपडीतील हातोडा डोक्यात घालून गंभीर जखमी केले. महिलेला उपचारासाठी सायन रुग्णालयात दाखल केले होते. ३१ ऑक्टोबरला उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू झाला. या प्रकरणी कोपरखैरणे पोलिसांनी राजूविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला होता. या घटनेनंतर आरोपी फरार झाला होता. एक महिन्यापासून वेशांतर करून तो पोलिसांना गुंगारा देत होता. आरोपी मोबाइल व इतर संपर्काचे कोणतेच साधन वापरत नसल्यामुळे त्याचा शोध लागत नव्हता. पोलिसांनी समाज माध्यमातून त्याचे छायाचित्र प्रसारित करून शोध सुरू केला होता. २५ नोव्हेंबरला १ वाजण्याच्या सुमारास त्याला सीबीडीमधून अटक केली आहे.पोलीस आयुक्त बिपिन कुमार, परिमंडळ १चे उपआयुक्त सुरेश मेंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप तिदार, नीलेश धुमाळ, वसीम शेख, सम्राट वाघ, जयराम पवार, गणेश गीते, शिवानंद पाटील, नितीन भिसे यांनी या गुन्ह्याचा उलगडा केला.