कुलदीप घायवट मुंबई : मुंबईतील पर्यावरणाचा ºहास होत आहे. त्यामुळेच वन्यप्राणी मानवी वस्तीत शिरत असल्याच्या घटना वाढत आहेत. ते आपल्या भक्षाच्या शोधात फिरत आहेत. मात्र, जंगले वाचविली, तर वन्य प्राणीही वस्तीत घुसणार नाहीत. आपण पुढाकार घेऊन प्राण्यांची काळजी घेणे गरजेचे आहे. त्यांना योग्य वातावरण, योग्य ठिकाणे यांची व्यवस्था केली पाहिजे, असे मत संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील ‘अर्जुन’ नावाच्या बिबट्याला मागील चार वर्षांपासून दत्तक घेणाऱ्या साधना वझे यांनी व्यक्त केले. ‘लोेकमत’ने ‘वन्यजीव सप्ताहा’निमित्त त्यांच्याशी खास संवाद साधला.
देखभालीविषयी काय सांगाल?प्राणिप्रेम, समाजकार्य करण्याची जाणीव असल्याने ‘अर्जुन’ बिबट्याला मागील चार वर्षांपासून दत्तक घेत आहे. एका वर्षासाठी १ लाख २० हजार रक्कम खर्चून चार वर्षांपूर्वी अर्जुनला दत्तक घेतले. त्याचा सांभाळ नॅशनल पार्कमध्ये योग्यरीत्या केला जात आहे. तेथील सर्व कर्मचारी, अधिकारी बिबट्याचा योग्यरीत्या सांभाळ करत असतात. याच कारणास्तव अर्जुन आजारी पडल्याची घटना घडलेली नाही; ही कौतुकास्पद बाब आहे.अर्जुनबद्दल कशी माहिती मिळाली?ताडोबा, कान्हा या अभयारण्यात फिरल्याने तेथे अनेक वन्य प्राणी पाहिले. चार वर्षांपूवी सहजच संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात गेल्यावर दत्तक योजनेबद्दल माहिती मिळाली. तेव्हा लगेच अर्जुन बिबट्याला दत्तक घेतले. मागील चार वर्षांपासून या बिबट्याला दत्तक घेत आहे. जोपर्यंत अर्जुन बिबट्या आहे किंवा जोपर्यंत मी असणार तोपर्यंत बिबट्याला दत्तक घेत राहणार.
प्राण्यांविषयी जिव्हाळा कसा निर्माण झाला?बालपण आणि शिक्षण विलेपार्लेत झाले. पार्ले टिळक विद्यालय (आताचे साठ्ये महाविद्यालय) येथे मी शिकले. घरात पाळीव प्राणी असल्याने प्राण्यांची ओढ होतीच. प्राण्यांमध्ये आपुलकी, जिव्हाळा खूप असतो. त्यामुळे त्यांच्याशी खूप घट्ट नाते तयार होते.
सामाजिक कार्याबाबत काय सांगाल?रोटरी क्लब, मराठी विज्ञान परिषद यांसारख्या संस्थांमध्ये मी कार्यरत आहे. ब्रेल लिपीतील आतापर्यंत ६० पुस्तके प्रकाशित केली आहेत. अनेक लेखकांची वेगवेगळ्या विषयांवरील पुस्तके ब्रेल लिपीत उपलब्ध करून दिली आहेत.