ऐरोली नाट्यगृहाच्या आसनक्षमतेमध्ये होणार वाढ 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2019 02:21 AM2019-06-26T02:21:33+5:302019-06-26T02:21:56+5:30

ऐरोलीमधील नाट्यगृहाच्या आसनक्षमतेमध्ये वाढ करण्याचा निर्णय महानगरपालिकेने घेतला आहे. पूर्वीच्या आराखड्यात ५५० आसनांचा समावेश होता.

 The will of the aeroli theater will increase | ऐरोली नाट्यगृहाच्या आसनक्षमतेमध्ये होणार वाढ 

ऐरोली नाट्यगृहाच्या आसनक्षमतेमध्ये होणार वाढ 

Next

नवी मुंबई : ऐरोलीमधील नाट्यगृहाच्या आसनक्षमतेमध्ये वाढ करण्याचा निर्णय महानगरपालिकेने घेतला आहे. पूर्वीच्या आराखड्यात ५५० आसनांचा समावेश होता. नाट्यकर्मींनी केलेल्या सूचनांनंतर आराखड्यात बदल करण्यात आला असून ८६० आसनांची व्यवस्था केली आहे. लवकरच या कामास सुरुवात केली जाणार आहे.
नवी मुंबईमध्ये वाशीत विष्णुदास भावे नाट्यगृह असून मनपा क्षेत्रातील नाट्यरसिकांसाठी हा एकमेव पर्याय आहे. ऐरोली, दिघा परिसरातील नागरिकांना सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी वाशीपर्यंत जावे लागत असल्यामुळे ऐरोलीमध्ये नवीन नाट्यगृह उभारण्याची मागणी नागरिकांनी केली होती. महापालिकेने सेक्टर ५ मधील भूखंड क्रमांक ३७ वर नाट्यगृहाचे काम पाच वर्षांपूर्वी सुरू केले होते; परंतु विविध कारणांमुळे ते काम रखडले होते. जुन्या आराखड्याप्रमाणे नाट्यगृहामध्ये ३१० आसनांचा समावेश केला होता; परंतु एवढी आसनक्षमता अत्यंत अपुरी असल्याचे नाट्यकर्मींनी सांगितले होते. अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी, मराठी बाणा फेम अशोक हांडे यांनी आसनक्षमता वाढवून घेण्यासाठी पाठपुरावा केला होता. महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांच्या उपस्थितीमध्ये एक बैठकही झाली होती. आयुक्तांनी नाट्यकर्मींच्या सूचनांचा आदर करून नवीन आराखडा तयार केला आहे. त्यामध्ये नाट्यगृहाची आसनक्षमता ८६० करण्यात अली आहे. या कामासाठी महानगरपालिकेने निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. पुढील दोन महिन्यामध्ये नाट्यगृहाच्या कामासाठी ठेकेदाराची नियुक्ती केली जाणार आहे. नवीन कामासाठी ६८ कोटी ७६ लाख रुपये खर्च येणार आहे.
महानगरपालिकेने नाट्यकर्मींच्या सूचनांचा आदर करून नवीन आराखडा तयार केल्याचा लाभ शहरवासीयांना होणार आहे. कमी आसनक्षमतेसह नाट्यगृहाचे काम झाले असते तर पालिकेचे पैसे व्यर्थ गेले असते. चांगली नाटके व इतर महत्त्वाचे कार्यक्रम या नाट्यगृहात घेता आले नसते. ऐरोलीकरांना व नाट्यकर्मींनाही पुन्हा वाशीतील विष्णुदास भावे नाट्यगृहाचा आधार घ्यावा लागला असता.

अशी आहे नाट्यगृहाची रचना

पहिले व दुसरे तळघर : ९४ वाहनांसाठी पार्किंग ४१ दुचाकी वाहनांसाठी पार्किंगची सोय
तळमजला : तिकीट घर, महिला व पुरुष प्रसाधनगृह, रंगीत तालीम कक्ष, मुख्य प्रवेशद्वार, प्रदर्शनीय क्षेत्र
पहिला मजला : मेकअप रूम, महिला व पुरुषांसाठी दोन प्रसाधनगृह, अपंगांसाठी प्रसाधनगृह व उपाहारगृह
दुसरा मजला : ग्रीन रूम, प्रशासकीय दालन आणि बहुउद्देशीय सभागृह
तिसरा मजला : अधिकारी कक्ष, अतिथीगृह व उपाहारगृह
चौथा मजला : विशेष अतिथीगृह आणि अधिकारी कक्ष

वाशीप्रमाणेच ऐरोली परिसरातील नाट्यरसिकांसाठी देखील एखादे नाट्यगृह असावे, ही संकल्पना प्रत्यक्षात येत आहे. हा प्रलंबित प्रकल्प मार्गी लावत असताना सुधारित अंदाजपत्रकानुसार ऐरोलीच्या नाट्यगृहाचे काम आता सुरू होणार आहे.
- जयवंत सुतार, महापौर

नाट्यगृहाच्या कामासाठी निविदा प्रक्रिया सुरू झाली आहे. पुढील दीड महिन्यात ती पूर्ण करण्याचा प्रयत्न असेल, आधुनिक पद्धतीने नाट्यगृह बांधण्यात येणार आहे.
- गिरीश गुमास्ते, कार्यकारी अभियंता, महापालिका

Web Title:  The will of the aeroli theater will increase

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.