नवी मुंबई: हभप बाबा महाराज सातारकर यांच्या निधनामुळे वारकरी संप्रदायाची कधीही न भरून येणारी हानी झाली आहे. महाराजांनी साध्या सोप्या शब्दात समाज प्रबोधन केले. नवी पिढी अध्यात्माशी जोडली. शासनाच्यावतीने योग्य स्मारक उभारून त्यांच्या कार्याचा व विचारांचा वारसा जपण्यात येईल असे मत उपमुख्य मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.
नवी मुंबई नेरूळमधील विठ्ठल रूक्मीणी मंदिरात बाबा महाराज सातारकर यांच्या पार्थीवाचे दर्शन घेतले. महाराज आज शरिराने आपल्या सोबत नसले तरी विचाराने कायम आपल्या सोबत राहतील. दादामहाराजांपासून सुरू असलेली अध्यात्माची परंपरा सातारकर घराण्यातील सर्व पिढ्या जतन करत आहेत. वारकरी संप्रदायाचे विचार व परंपरेला महाराजांनी नवीन आयाम दिला. किर्तन प्रवचनातून लाखो नागरिकांना व्यसनमुक्त केले. नवीन पिढीला अध्यात्माची गोडी लावली असे मतही फडणवीस यांनी व्यक्त केले.
बाबा महाराज सातारकर यांचे विचार व कार्याचा वारसा जपण्यासाठी शासन त्यांचे उचीत स्मारक उभारेल असे अश्वासन ही देवेंद्र फडणवीस यांनी यावेळेस दिले. यावेळी माजी आमदार संदीप नाईक, महानगर पालिका आयुक्त राजेश नार्वेकर, पोलीस आयुक्त मिलींद भारांबे उपस्थित होते.