‘देहरजी’ भागविणार नवीन पालघरची तहान; सिडकोचा एमएमआरडीएबरोबर करार
By कमलाकर कांबळे | Published: December 7, 2022 05:30 AM2022-12-07T05:30:00+5:302022-12-07T05:32:09+5:30
तांत्रिक कारणांमुळे रखडलेली कामेही आता पूर्ण झाली आहे. त्यामुळे आता दुसऱ्या टप्प्यातील म्हणजेच पालघर नवीन शहर प्रकल्प उभारणीच्या दिशेने सिडकोने कंबर कसली आहे.
कमलाकर कांबळे
नवी मुंबई : नवीन पालघर शहराच्या विकासासाठी सिडकोने कंंबर कसली आहे. त्यानुसार नियोजित नवीन पालघर शहराचा विकास आराखडा तयार करण्याचे काम सध्या प्रगतीपथावर आहे. या नवीन शहरासाठी सिडकोने पाण्याचेही नियोजन केले आहे. विक्रमगड तालुक्यातील देहरजी धरणाचे ५० एमएलडी पाणी नवीन पालघरला वळविण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे. एमएमआरडीएबरोबर अलीकडेच त्या संबंधीचा करार केल्याची माहिती सिडकोच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्याने दिली.
शहर निर्मितीत सिडकोचा हातखंडा आहे. नवी मुंबई हे याचे उत्तम उदाहरण आहे. सिडकोचा हा अनुभव लक्षात घेऊन राज्य सरकारने पालघर जिल्ह्यात नवीन शहर उभारण्याची जबाबदारी सिडकोवर सोपविली आहे. पालघर आणि बोईसर शहराच्या मध्यभागी ३३० हेक्टर क्षेत्रफळाच्या जागेवर हे अद्यावत नवीन शहर साकारले जात आहे. विशेष म्हणजे, पालघर जिल्ह्याची स्थापना झाल्यानंतर जिल्ह्याचे मुख्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय, पोलिस अधीक्षकांचे कार्यालय, जिल्हा परिषद कार्यालय, जिल्हा व सत्र न्यायालयाची इमारत, नवीन प्रशासकीय इमारत, प्रेक्षागृह, शासकीय विश्रामगृह तसेच जिल्हा मुख्यालयातील किमान दहा टक्के कर्मचारी आणि अधिकाऱ्यांसाठी निवासस्थान आदींच्या उभारणीची जबाबदारीही सिडकोवर सोपविली होती. त्यानुसार आतापर्यंत जिल्हा अधिकारी कार्यालय, जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालय आणि जिल्हा परिषद कार्यालयाच्या इमारतीची उभारणी केली आहे.
तांत्रिक कारणांमुळे रखडलेली कामेही आता पूर्ण झाली आहे. त्यामुळे आता दुसऱ्या टप्प्यातील म्हणजेच पालघर नवीन शहर प्रकल्प उभारणीच्या दिशेने सिडकोने कंबर कसली आहे. प्रस्तावित नवीन शहराचा विकास नियोजनबद्ध व सर्वसमावेशकरित्या व्हावा, यादृष्टीने आदर्श मॉडेल तयार केले आहे. त्यानुसार नवीन शहराचा विकास आराखडा तयार केला जात आहे. हे कामसुद्धा अंतिम टप्प्यात आहे.
१,४४४ कोटींचा धरणावर खर्च
देहरजी धरणासाठी नव्याने १,४४३ कोटी ७२ लाख रुपयांची सुधारित मान्यता एमएमआरडीएने दिली आहे. या धरणातून सिडकोनिर्मित नवीन पालघर शहरासाठी ५० एमएलडी, पालघर जिल्हा परिषदेस ३२ गावांच्या पाणी योजनेसाठी १० एमएलडी आणि एमएमआरडीए क्षेत्रासाठी १९५ एमएलडी पाणी राखीव ठेवले आहे. कोकण पाटबंधारे महामंडळ हे धरण बांधत आहे.
पाण्याचे नियोजन सुरू
एमएमआरडीएच्या माध्यमातून विक्रमगड तालुक्यात २५५ एमएलडी क्षमतेचे देहरजी धरण बांधले जात आहे. या धरणात एमएमआरडीए क्षेत्रातील लोकवस्तीसाठी या धरणात पाणीसाठा राखीव केला जाणार आहे. ठाणे आणि पालघर जिल्ह्यात मुळातच पाण्याची समस्या आहे. अशा परिस्थितीत नवीन पालघर प्रकल्पाची तहान कशी भागवणार, असा सवाल केला जात होता. त्यादृष्टीने सिडकोने आतापासून पाण्याचे नियोजन सुरू केले आहे. त्यानुसार या धरणातील ५० एमएलडी पाणीसाठा राखीव करण्यासाठी अलीकडेच एमएमआरडीए बरोबरच करार केला आहे.