मेट्रोचा मुहूर्त पुन्हा हुकणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2019 11:25 PM2019-09-16T23:25:49+5:302019-09-16T23:25:55+5:30
सिडकोचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या मेट्रोच्या पहिल्या टप्प्याच्या सेवेची नवी मुंबईकरांना प्रतीक्षा लागून राहिली आहे.
नवी मुंबई : सिडकोचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या मेट्रोच्या पहिल्या टप्प्याच्या सेवेची नवी मुंबईकरांना प्रतीक्षा लागून राहिली आहे. या प्रकल्पाचे काम ९५ टक्के पूर्ण झाल्याचा दावा सिडकोकडून करण्यात आला आहे. त्यामुळे सर्व प्रक्रिया पूर्ण करून साधारण मे २0२0 मध्ये या मार्गावर प्रत्यक्ष मेट्रो धावेल, असे कयास बांधले जात आहेत. मात्र कामाची गती पाहता हा मुहूर्त सुद्धा हुकण्याची शक्यता जाणकारांकडून वर्तविण्यात येत आहे.
आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पार्श्वभूमीवर सिडकोच्या माध्यमातून २0११ मध्ये नवी मुंबई मेट्रो प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले. विमानतळाला जोडणाऱ्या या प्रकल्पाची चार टप्प्यात विभागणी करण्यात आली आहे. बेलापूर ते पेंधर हा ११ किमी लांबीचा पहिला टप्पा आहे. या मार्गावर ११ स्थानके आहेत. पहिल्या टप्प्यासाठी सुमारे तीन हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे. नियोजित वेळेत काम पूर्ण न झाल्याने प्रकल्पाचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढला आहे. आता हे काम अंतिम टप्प्यात आल्याचा दावा सिडकोने केला आहे.
सध्या ९५ टक्के कामे पूर्ण झाली असून स्थानकाची कामे काही प्रमाणात अर्धवट आहेत. त्याचबरोबर मेट्रो धावण्यासाठी आवश्यक असणाºया अनेक लहान मोठ्या गोष्टींची पूर्तता करणे बाकी आहे. ही उर्वरित कामे पुढील काही महिन्यात पूर्ण करून अंतिम चाचणी घेतली जाईल. त्यानंतर या मार्गावर प्रत्यक्ष प्रवासी सेवा सुरू करण्यासाठी रेल्वे सुरक्षा आयुक्तांची परवानगी घ्यावी लागणार आहे. या प्रक्रियेला सहा महिन्याचा कालावधी लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. सध्या सुरू असलेली कामे पूर्ण करण्यासाठी आणखी चार ते पाच महिन्याचा कालावधी लागेल, असे सिडकोकडून सांगण्यात येत आहे. परंतु ही कामे अत्यंत कुर्मगतीने सुरू आहेत. त्यामुळे शिल्लक कामे पूर्ण करून आवश्यक सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी साधारण वर्षभराचा कालावधी लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
यावरून सिडकोने मेट्रोसाठी दिलेला मे २0२0 चा मुहूर्त सुध्दा नवी मुंबईकरांना हुलकावणी देण्याची शक्यता जाणकारांकडून वर्तविण्यात येत आहे.
।मुख्यमंत्र्यांच्या हस्ते चाचणी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गेल्या आठवड्यात तळोजा येथील मेट्रो डेपोत मेट्रोची चाचणी घेण्यात आली. ही चाचणी यशस्वी झाल्याचे सिडकोकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे पुढील वर्षात मेट्रोची सेवा सुरू होईल, असा दावा केला जात आहे. मात्र पहिल्या टप्प्याच्या मार्गात अपूर्ण असलेली कामे पाहता हा दावा फोल ठरण्याची शक्यता निर्माण झाली आहे.