बाबासाहेबांनी लिहिलेले संविधान बदलू देणार नाही, रामदास आठवलेंचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2018 03:34 AM2018-11-05T03:34:22+5:302018-11-05T03:36:34+5:30
रिपब्लिकन पक्ष आहे, तोपर्यंत बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले संविधान बदलू देणार नाही व त्याकडे वाकड्या नजरेने कोणाला पाहताही येणार नाही, असा इशारा राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिला अहो.
नवी मुंबई - रिपब्लिकन पक्ष आहे, तोपर्यंत बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले संविधान बदलू देणार नाही व त्याकडे वाकड्या नजरेने कोणाला पाहताही येणार नाही, असा इशारा राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिला अहो. सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांच्या सत्कार सोहळ्याप्रसंगी ते वाशीत उपस्थित होते. सदर कार्यक्रमास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली होती.
पॅथर नामदेवराव गायकवाड चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. वाशीतील विष्णुदास भावे नाट्यगृहात झालेल्या या कार्यक्रमास केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले प्रामुख्याने उपस्थित होते. त्यांच्या हस्ते विविध क्षेत्रातील मान्यवरांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर ‘समाजरत्न’ व ‘समाजभूषण’ पुरस्काराने गौरवण्यात आले. या वेळी आठवले यांनी बाबासाहेबांच्या संविधानात बदल होऊ देणार नाही, अथवा त्याकडे कोणाला वाकड्या डोळ्यानेही पाहू देणार नाही, असा इशारा दिला. सदर कार्यक्रमाचे आयोजन विजय कांबळे, एल. आर. गायकवाड, नारायण मोरे, सचिन कटारे, भरत भालेराव, विशाल कांबळे तर आयोजन ट्रस्टचे अध्यक्ष सुभाष गायकवाड, सुमित्रा गायकवाड व विठ्ठल गायकवाड यांनी केले होते. रिपब्लिकन ऐक्यासाठी पॅथरसारखी संघटना बरखास्त करावी लागली; पण आज एकत्र येण्याऐवजी अनेक जण नवनवीन गट काढत आहेत, असे गट काढण्यापेक्षा नेत्यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न व्हायला हवा, असेही आठवले म्हणाले.
या प्रसंगी प्रा. सुषमा अंधारे, सुमंतराव गायकवाड, नगरसेवक जगदिश गायकवाड, जिल्हाध्यक्ष सिद्राम ओहोळ, चंद्रकांत जगताप, नागेश कांबळे, आप्पासाहेब शिवशरण, युवराज मोरे, टिळक जाधव, शीलाताई बोदडे आदी उपस्थित होते.