नवी मुंबई : शेतकऱ्यांच्या कांद्याला चांगला भाव मिळवून देण्याबरोबर ग्राहकांनाही महागाईची झळ बसणार नाही याची काळजी सरकार घेत आहे. दोन्ही घटकांना न्याय दिला जाईल. शेतकऱ्यांचे नुकसान होऊ दिले जाणार नाही असे आश्वासन पणनमंत्री अब्दूल सत्तार यांनी दिले आहे.
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील समस्या समजून घेतल्यानंतर पणनमंत्र्यांनी मार्केटमधील कांद्याची आवक व बाजारभावाची माहिती घेतली. व्यापाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर १० ते २४ रूपयांपर्यंत चांगल्या कांद्याला भाव मिळत असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. मार्केटमध्ये ज्या भावाने कांद्याची विक्री होत आहे, त्यापेक्षा जास्त भाव देवून केंद्र सरकार २ लाख टन कांदा खरेदी करणार आहे. २४ रुपये दराने ही खरेदी केली जाणार आहे. शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव मिळवून दिला जाईल. दुसरीकडे ग्राहकांनाही महागाईची झळ बसणार नाही याची काळजी घेतली जाणार असल्याचे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.
राज्यातील शेतकऱ्यांच्या भावना केंद्र सरकारपर्यंत पोहचविल्या आहेत. कांद्याचा साठा व बाजारभाव यावर लक्ष ठेवले जात आहे. शेतकरी व ग्राहक दोघांच्या हिताची काळजी घेत असल्याचेही सत्तार यांनी यावेळी सांगितले. मुंबईमध्ये कोठून किती कांदा येतो याचीही विचारणा केली. व्यापारी, माथाडी कामगार यांच्याशी चर्चा करून समस्या समजून घेतल्या.मुंबईत १००५ टन कांद्याची आवक
मुंबई बाजार समितीमध्ये मंगळवारी फक्त ५३२ टन कांद्याची आवक झाली होती. बुधवारी आवक वाढली आहे. बाजार समितीमध्ये १००५ टन कांद्याची आवक झाली आहे. होलसेल मार्केटमध्ये १० रुपयांपासून ते २४ रूपयांपर्यंत कांद्याला भाव मिळत आहे.