एपीएमसीमधील पुनर्बांधणीसह चटईक्षेत्राचा प्रश्न सोडविणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2019 11:51 PM2019-07-24T23:51:04+5:302019-07-24T23:51:12+5:30

पणनमंत्र्यांचे आश्वासन : संक्रमण शिबिरासाठी तत्काळ परवानगी देण्याचे आदेश

Will solve mattress problem with rebuild in APMC | एपीएमसीमधील पुनर्बांधणीसह चटईक्षेत्राचा प्रश्न सोडविणार

एपीएमसीमधील पुनर्बांधणीसह चटईक्षेत्राचा प्रश्न सोडविणार

Next

नवी मुंबई : कांदा बटाटा मार्केटची पुनर्बांधणी, भाजी व फळ मार्केटमधील चटईक्षेत्राचा प्रश्न शक्य तितक्या लवकर सोडविला जाईल. मुंबई बाजार समितीला राष्ट्रीय दर्जा देण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न केले जातील, असे आश्वासन पणनमंत्री राम शिंदे यांनी दिले आहे. मार्केट पुनर्बांधणीदरम्यान पर्यायी सुविधा म्हणून संक्रमण शिबिर उभारण्यासाठी तत्काळ परवानगी देण्यात यावी, असे निर्देशही त्यांनी पणन संचालकांना दिले आहेत.

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील प्रश्न सोडविण्यासाठी आमदार मंदा म्हात्रे व व्यापाऱ्यांनी काही दिवसांपूर्वी पणनमंत्री राम शिंदे यांची भेट घेतली होती. त्या भेटीदरम्यान प्रत्यक्षात बाजार समितीमध्ये येवून प्रश्न समजून घेण्याचे आश्वासन दिले होते. बुधवारी सकाळी पणनमंत्र्यांनी बाजार समितीला भेट देवून कांदा, बटाटा, भाजी व फळ मार्केटमधील व्यापाऱ्यांचे प्रश्न समजून घेतले. कांदा मार्केटमधील व्यापाºयांनी पुनर्बांधणीचा प्रश्न लवकर मार्गी लागावा, मसाला मार्केटप्रमाणे जादा चटईक्षेत्र उपलब्ध व्हावे अशी मागणी केली. मार्केटची पुनर्बांधणी करताना येथील व्यापार बंद पडणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. अद्याप संक्रमण शिबिराचा प्रश्न सुटलेला नाही. प्रशासनाने पाठविलेल्या प्रस्तावास पणन संचालकांची परवानगी मिळाली नसल्याचेही व्यापाºयांनी निदर्शनास आणून दिले. भाजी व फळ मार्केटमधील व्यापाºयांनीही वाढीव चटईक्षेत्र उपलब्ध व्हावे अशी मागणी केली. बाजार समिती परिसरात वाहतूककोंडीची समस्या गंभीर झाली आहे. हा प्रश्न सोडविण्यासाठी परिसरातील नाल्यांवर वाहनतळ विकसित केले जावे. उच्च विद्युत दाबाच्या वीजवाहिनीखाली वाहनतळ विकसित करण्यास परवानगी मिळावी व इतर उपाययोजना कराव्या अशी मागणी केली. मार्केटमध्ये स्वच्छता व सुरक्षेचा प्रश्न सोडविण्याची मागणीही यावेळी करण्यात आली.

बाजार समितीचे प्रशासक सतीश सोनी यांनी पणनमंत्र्यांचे स्वागत करून येथील कामकाजाची माहिती दिली. सचिव अनिल चव्हाण यांनी बाजार समितीच्या स्थापनेपासून उत्पन्नापर्यंतची सर्व माहिती दिली. पणनमंत्र्यांनी सर्वांच्या समस्या ऐकून घेवून लवकरात लवकर येथील प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले जातील असे सांगितले. पुनर्विकासाचे व चटईक्षेत्राचा प्रश्नही लवकर सोडविला जाईल असे स्पष्ट केले. संक्रमण शिबिराला परवानगी देण्याची कार्यवाही गतीने करावी अशा सूचना पणन संचालकांना दिल्या आहेत. यावेळी आमदार मंदा म्हात्रे, बाजार समितीचे अधिकारी व व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मुंबई बाजार समितीमधील प्रश्न सोडविण्यास प्राधान्य दिले जाईल. कांदा मार्केटची पुनर्बांधणी, चटईक्षेत्र, वाहनतळ, सुरक्षा व स्वच्छतेसह सर्व प्रश्न शक्य तितक्या लवकर सोडविण्यासाठी प्रयत्न राहील. यासाठी लवकरच सिडको, महापालिका, बाजार समिती व संबंधित विभागाची बैठकही आयोजित केली जाईल. - राम शिंदे, पणनमंत्री

मुंबई बाजार समितीमधील प्रश्न सोडविण्यासाठी पाच वर्षे सातत्याने पाठपुरावा केला आहे. विस्तारित भाजी मार्केटच्या २८५ गाळ्यांचा वापर बदल करण्यास परवानगी घेवून त्यांच्या रचनेमध्ये बदल केला आहे. मार्केटचे बांधकाम पूर्ण होत आले असून लवकरच त्याचे उद्घाटन करण्यात येईल. - मंदा म्हात्रे, आमदार

भाजी मार्केटसाठी वाढीव चटईक्षेत्र मिळावे. मार्केट आवारात पार्किंगचा प्रश्न गंभीर झाला आहे. त्यासाठी योग्य उपाययोजना केल्या पाहिजेत. मुंबई बाजार समिती राष्ट्रीय बाजार व्हावा यासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्या. - शंकर पिंगळे, व्यापारी प्रतिनिधी

फळ मार्केटचे बांधकाम जुने झाले आहे. अनेक ठिकाणी बांधकामाला तडे गेले आहेत. मार्केटचा पुनर्विकास व्हावा व वाढीव चटईक्षेत्र उपलब्ध व्हावे. वाहतूककोंडी, सुरक्षा व्यवस्था व स्वच्छतेचा प्रश्न सोडविण्यात यावा. - चंद्रकांत ढाले, फळ व्यापारी

कांदा - बटाटा मार्केटची पुनर्बांधणी करण्यासाठी शासनाने सकारात्मक भूमिका घेतली आहे. परंतु अद्याप संक्रमण शिबिराचा प्रश्न सुटलेला नाही. लवकरात लवकर संक्रमण शिबिराला परवानगी मिळावी व इतर प्रश्नही सोडविले जावेत. - राजू मणीआर, कांदा -बटाटा मार्केट

Web Title: Will solve mattress problem with rebuild in APMC

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.