नवी मुंबई : राज्यात निर्माण झालेल्या सत्तासंघर्षामुळे सिडकोची नियोजित २६ नोव्हेंबरची घरांची सोडत रखडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.स्वप्नपूर्ती प्रकल्पातील शिल्लक राहिलेली ८१४ आणि नवीन प्रकल्पातील ९२४९ घरांसाठी सिडकोने आॅनलाइन अर्ज मागविले होते. हे अर्ज सादर करण्यासाठी ५ नोव्हेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली होती. या कालावधीत जवळपास एक लाख अर्ज प्राप्त झाल्याचे सिडकोकडून स्पष्ट करण्यात आले आहे. विशेष म्हणजे या घरांसाठी २६ नोव्हेंबर रोजी संगणकीय सोडत काढण्याचे सिडकोने जाहिर केले आहे. मात्र, मागील वीस दिवसांपासून राज्यात निर्माण झालेल्या सत्तासंघर्षामुळे नियोजित सोडत काढण्याबाबत सिडको प्रशासन काहीसे संभ्रमात असल्याचे समजते. असे असले, तरी सोडतीचा कार्यक्रम हा पूर्वनियोजित असल्याने सिडकोच्या संबंधित विभागाने त्या दृष्टीने तयारी सुरू केल्याचे समजते. दरम्यान, सोमवारी राज्यातील सत्तास्थापनेचा प्रश्न निकाली निघाला आहे. त्यानुसार राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या पाठींब्यावर शिवसेना सत्ता स्थापण करणार हे आता निश्चित झाले आहे. मात्र या संपूर्ण प्रक्रियेला आठ ते दहा दिवस लागण्याची शक्यता असल्याने याचा फटका सिडकोच्या घराच्या नियोजित सोडतीला बसण्याची शक्यता सुत्राने वर्तविली आहे.
सिडकोच्या घरांची सोडत रखडणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2019 12:32 AM