पनवेल पालिकेच्या सभेत वादळी चर्चा
By admin | Published: March 23, 2016 02:25 AM2016-03-23T02:25:15+5:302016-03-23T02:25:15+5:30
पनवेल नगरपालिकेची सर्वसाधारण सभा मंगळवारी सभागृहात पार पडली. यावेळी विविध विषयांवर चर्चा झाली. सत्ताधारी आणि विरोधक काही विषयांवरून आमनेसामने आले.
पनवेल : पनवेल नगरपालिकेची सर्वसाधारण सभा मंगळवारी सभागृहात पार पडली. यावेळी विविध विषयांवर चर्चा झाली. सत्ताधारी आणि विरोधक काही विषयांवरून आमनेसामने आले. मात्र विविध विकासकामांना सुध्दा यावेळी मंजुरी देण्यात आली.
नगराध्यक्षा चारुशीला घरत यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या सभेला उपनगराध्यक्ष मदन कोळी, बांधकाम सभापती राजू सोनी, महिला व बालकल्याण सभापती सीता पाटील, पाणीपुरवठा सभापती अनिल भगत, विरोधी पक्षनेते संदीप पाटील, मुख्याधिकारी मंगेश चितळे, अतिरिक्त मुख्याधिकारी, चारुशीला पंडित नगरसेवक उपस्थित होते. सुरुवातीलाच इतिवृत्त वाचन सुरू असताना सभागृहात गदारोळ झाला.
मागील सभेत पाच विषयांबाबत जी काही चर्चा झाली होती, त्याबाबत इतिवृत्तात उल्लेख न करता सत्ताधाऱ्यांनी आपल्या सोयीनुसार निर्णय घेतले असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते संदीप पाटील यांनी केला. त्याचबरोबर पनवेल शहरातील काही समस्यांबाबतही विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये चर्चा झाली. याव्यतिरिक्त पनवेल शहरातील काही रस्त्यांचे सिमेंटीकरण कृष्णाळे तलावाकरिता संरक्षण भिंत बांधण्याच्या कामाला मंजुरी देण्यात आली. मलनिस्सारण केंद्रातून प्रक्रि या झालेल्या पाण्याचा वापर करण्याकरिता यंत्रणा विकसित करण्याकरिता जो खर्च येईल, त्या कामालाही सभेने मंजुरी दिली.
सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान प्रस्तावित केलेल्या कामांना सुध्दा हिरवा कंदील देण्यात आला. पनवेल शहरात महानगर गॅस लिमिटेड यांना शहरातील काही भागांत गॅस वाहिन्या टाकण्यास पालिकेने मंजुरी दिली. पालिकेच्या शाळांची रंगरंगोटी, त्याचबरोबर डागडुजी करण्याचा निर्णय सभेत सर्वानुमते घेण्यात आला. प्राथमिक कन्याशाळेच्या नवीन इमारतीच्या बांधकाम आराखड्यास सुध्दा मान्य करण्यात आला. पालिका क्षेत्रात अल्पसंख्याकबहुल विभागातील विविध विकासकामांना प्रशासकीय व आर्थिक मंजुरी देण्यात आली. याशिवाय विविध ५० पेक्षा जास्त विषयांवर चर्चा करण्यात आली, त्याचबरोबर निर्णय घेण्यात आला.
सत्ताधारी नगरसेवक प्रकाश बिनेदार यांनी १४ एप्रिल रोजी आयोजित करण्यात येणाऱ्या कार्यक्रमानिमित्त जी बैठक बोलाविण्यात आली होती, त्यावेळी फक्त १० नगरसेवक उपस्थित होते, याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. अशोक भुजबळ यांच्याऐवजी नगरसेवक सुभाष भुजबळ यांचे नाव शिपाई म्हणून छापण्यात आल्याने गोंधळ झाला.
पालिकेच्या वतीने सुमारे १० लाख रुपये मुख्यमंत्री साहाय्यता निधी जमा करण्याची सूचना विरोधकांनी केली. (प्रतिनिधी)