नवी मुंबई : नैना प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यातील १५२ पैकी ८० गावे वगळण्यात आली आहेत. वगळलेल्या गावांचा आता एमएमआरडीए विकास करणार आहे. राज्य शासनाच्या निर्देशानुसार सिडकोने हा निर्णय घेतला असून, बुधवारी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत त्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. त्यामुळे संपूर्ण नैना क्षेत्र फक्त ९५ गावांपुरते मर्यादित झाले आहे.आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरातील क्षेत्राचा नियोजनबद्ध विकास व्हावा, यादृष्टीने शासनाने रायगड जिल्ह्यातील २५६ व ठाणे जिल्ह्यातील १४ अशा २७० गावांचे सुमारे ५६० किमी क्षेत्र नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रभावित अर्थात नैना क्षेत्र म्हणून अधिसूचित करून विकासासाठी सिडकोची नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्ती केली. मात्र, दरम्यानच्या काळात या क्षेत्रातील काही गावे नियोजनासाठी एमएसआरडीसीकडे वर्ग केली. तर काही गावांचा समावेश पनवेल महापालिकेत केला. त्यामुळे नैनाचे क्षेत्र २२४ गावांपुरते मर्यादित राहिले. यापैकी सिडकोने पहिल्या टप्प्यात पनवेल तालुक्यातील २३ गावांचा समावेश करून विकासाचा पायलट प्रोजेक्ट तयार केला.
आराखड्याला मंजुरीराज्य शासनाच्या संबंधित विभागाने त्याच्या अंतरिम विकास आराखड्यालाही २७ एप्रिल २०१७ रोजी मंजुरी दिली. उर्वरित २०१ गावांच्या विकास आराखड्यालासुद्धा १६ सप्टेंबर २०१९ रोजी मंजुरी मिळाली.
२०१ गावांतून ४९ गावे वगळलीदुसऱ्या टप्प्यातील मूळ २०१ गावांतून ४९ गावे वगळली आहेत. खालापूर तालुक्यातील ३५ आणि ठाणे तालुक्यातील १४ अशी वगळलेल्या गावांची आकडेवारी आहे. त्यामुळे दुसऱ्या टप्प्यात आता केवळ १५२ गावे शिल्लक राहिली आहेत. पहिल्या टप्प्यातील २३ आणि दुसऱ्या टप्प्यातील १५२ अशा एकूण १७५ गावांच्या विकासासाठी सिडकोने कंबर कसली आहे. मात्र, यातच शासनाने दुसऱ्या टप्प्यातील ८० गावे वगळून आता ती एमएमआरडीएकडे वर्ग करण्याचा निर्णय घेतला आहे.