नवी मुंबई : शहरातील विविध समस्यांवर प्रकाश टाकत त्या सोडवण्याची मागणी बेलापुरच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी हिवाळी अधिवेशनात केली. त्यामध्ये एपीएमसी बाजारपेठेचा विकास करून त्यास आंतराष्ट्रीय दर्जा देण्याच्याही मागणीचा उल्लेख आहे. पुरवणी मागणीद्वारे मंदा म्हात्रे यांनी केलेल्या या मागण्यांवर विधानसभा अध्यक्ष नाना पाटोळे यांनीही सकारात्मकता दर्शविली आहे.
तुर्भे येथील एपीएमसी बाजारपेठ मागील अनेक वर्षांपासून विविध समस्यांनी ग्रासली आहे. आशिया खंडातली सर्वाधिक मोठी बाजारपेठ असूनदेखील त्याकडे विशेष लक्ष दिले जात नाहीये. परिणामी, जीर्ण झालेले बांधकाम ढाळण्याच्या स्थितीत असून, अनेक ठिकाणी सुरू असलेल्या पडझडीत कामगार जखमीदेखील होत आहेत. ही बाब हिवाळी अधिवेशनात मांडून, भविष्यात त्या ठिकाणी एखादी दुर्घटना घडल्यास जीवितहानीचीही शक्यता आमदार मंदा म्हात्रे यांनी व्यक्त केली. त्यामुळे शिल्लक असलेला एफ. एस. आय. मंजुर करून बाजारपेठेच्या पुनर्बांधणीचा मार्ग मोकळा करावा अशी मागणी त्यांनी केली आहे. त्याकरिता आधुनिक तंत्रज्ञान वापरुन त्याठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाचे मार्केट विकसीत करावे असेही त्यांनी सुचवले आहे. त्याशिवाय नवी मुंबईतल्या पोलीस वसाहतींच्याही पुर्नबांधणी करुन पोलिसांच्या कुटुंबियांना मृत्युच्या दाढेतून बाहेर काढण्याचीही मागणी आमदा मंदा म्हात्रे यांनी केली. शहरातील ऐतीहासीक वास्तु असलेल्या बेलापुर किल्याचेही संवर्धन काळाची गरज बनले आहे. आजवर त्याठिकाणी झालेल्या पडझडीमुळे किल्याचे शिल्लक भाग देखिल नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. यामुळे किल्याचे संवर्धन करण्यासाठी अतिरिक्त निधी उपलब्ध करुन देण्याचीही गरज त्यांनी व्यक्त केली आहे. त्याचप्रमाणे कार्ला येथील एकविरा देवीच्या मंदिराच्या पायरया व परिसराच्या सुशोभिकरणाचाही मुद्दा त्यांनी सभागृहात मांडला. त्याठिकाणी राज्यभरातुन भाविक येत असल्याने त्यांच्या सुविधांमध्ये भर टाकणे आवश्यक आहे. त्याकरिता पायरयांना संरक्षक कठडा, पुरेसे वाहनतळ, स्वच्छतागृहे व सुलभ दर्शनासाठी वातानुकूलित दर्शनरांगा व पेय जलाची सोय करण्याचीही मागणी त्यांनी केली. त्यांच्या या सर्व मागण्यांबाबत विधानसभा अध्यक्ष नाना पाटोळे यांनी सकारात्मकता दर्शवली आहे.