सहा महिन्यांतच ढासळू लागले रेलिंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2019 02:30 AM2019-09-23T02:30:52+5:302019-09-23T02:30:54+5:30
कामाच्या दर्जाबाबत नागरिकांनी उपस्थित केली शंका
नवी मुंबई : रस्त्यांलगत रेलिंग बसवण्याच्या कामात झालेल्या हलगर्जीमुळे ते ढासळू लागले आहेत. अशाच प्रकारातून गुरुवारी घणसोलीत रस्त्यालगतचे पूर्ण रेलिंग ढासळले. सुदैवाने त्यामध्ये कोणाला दुखापत झाली नाही. मात्र निकृष्ट कामांमुळे रेलिंग पडत असल्याने पादचाऱ्यांना जीव मुठीत धरून चालावे लागत आहे.
पालिकेच्या वतीने शहरातील प्रत्येक नोडमधील रस्त्यांलगत रेलिंग बसवण्यात आले आहेत. मात्र ठेकेदारांमार्फत ही कामे केली जात असताना त्यात निष्काळजीपणा झाल्याचे दिसून येत होते. त्यामुळे रेलिंग बसवल्याच्या काही दिवसातच ते वाकल्याचे किंवा त्याखालील भाग खचल्याचे दिसून येत होते. अशाच प्रकारे घणसोली सेक्टर ७ येथे देखील संपूर्ण रेलिंग रस्त्याकडील बाजूला झुकले होते. परंतु लोकप्रतिनिधींसह पालिका अधिकाऱ्यांकडून त्याकडे डोळेझाक होत होती. परिणामी गुरुवारी रात्री ते रेलिंग रस्त्यावर कोसळले. त्याच ठिकाणी नागरिकांना पदपथावर बसण्यासाठी बैठक व्यवस्था करण्यात आलेली आहे. यानुसार त्याठिकाणी सकाळ-संध्याकाळ ज्येष्ठ नागरिक व लहान मुले बसलेली असतात. त्यामुळे जर हे रेलिंग पदपथावर कोसळले असते, तर जीवितहानीचीही शक्यता निर्माण झाली असती. यामुळे पादचाºयांसह रहदारीला देखील अडथळा निर्माण होत आहे.
अशाच प्रकारे शहरातील इतरही अनेक ठिकाणचे रेलिंग कोसळण्याच्या स्थितीत आहेत. यानंतरही लोकप्रतिनिधींकडून त्याची दखल घेतली जात नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे पालिकेने सहा महिन्यांपूर्वी सर्वच नोडमध्ये केलेल्या रेलिंगच्या कामात लोकप्रतिनिधींचाही
अर्थपूर्ण हितसंबंध असल्याचा संशय नागरिकांकडून व्यक्त होत आहे.