नवी मुंबई : धोकादायक इमारतीच्या यादीत असलेल्या कोपरखैरणे येथील संगम गृहनिर्माण या इमारतीच्या बाल्कनीचा काही भाग कोसळला. या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी खबरदारी म्हणून महापालिकेने पाणी व वीज जोडणी खंडित करून इमारत युद्धपातळीवर रिकामी केली. त्यामुळे ३४ कुटुंबांना रातोरात बेघर व्हावे लागले. विशेष म्हणजे अवघ्या १० वर्षांतच ही इमारत धोकादायक बनल्याने यानिमित्ताने शहरातील शेकडो इमारतींच्या बांधकाम दर्जाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.कोपरखैरणे सेक्टर १९ येथील प्लॉट क्रमांक ३५९/३६0 येथे ही एम.जे. डेव्हलपर्स या विकासकाने ही संगम नावाची चार इमारत उभारली आहे. २00१मध्ये या इमारतीच्या बांधकामाला सुरुवात करण्यात आली. या इमारतीत निवासी व व्यावसायिक असे एकूण २४ गाळे आहेत. घरांचा ताबा दिल्यानंतर विकासकाने येथील रहिवाशांकडे पाठ फिरविली. विशेष म्हणजे अवघ्या १० वर्षांत महापालिकेने ही इमारत धोकादायक म्हणून घोषित केली आहे. यासंदर्भात सोसायटीला पहिली नोटीस २0१३मध्ये बजावण्यात आली. त्यानंतर मागील तीन वर्षांपासून नियमितपणे घरे खाली करण्यासंदर्भात नोटिसा बजावल्या जात आहेत. महापालिकेची पहिली नोटीस प्राप्त झाल्यानंतर रहिवाशांनी इमारतीची तात्पुरती डागडुजी केली. परंतु इमारतीचे बांधकाम अत्यंत निकृष्ट दर्जाचे असल्याने ही डागडुजीही कुचकामी ठरली. याचा परिणाम म्हणून १२ दिवसांपूर्वी या इमारतीच्या बाल्कनीचा काही भाग निखळून पडला. या दुर्घटनेची तातडीने दखल घेत महापालिकेने रातोरात ही इमारत रिकामी करण्याचे फर्मान रहिवाशांना सोडले. इतकेच नव्हे, तर इमारतीचा पाणी व विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला. त्यामुळे येथे राहणाऱ्या ३४ कुटुंबांवर बेघर होण्याची पाळी आली. मुकेश भाटीया, शशी भामेरा, जितू भामेरा व चेतन भामेरा अशी या इमारतीच्या विकासकांची नावे आहेत. घरांचा ताबा दिल्यानंतर हे विकासक परागंदा झाले आहेत. त्यामुळे सोसायटी स्थापण करण्यापासून अभिहस्तांतरणाची प्रक्रिया रहिवाशांनाच पूर्ण करावी लागली. विशेष म्हणजे विकासकाने या इमारतीत अनधिकृत बांधकाम केले आहे. त्यामुळे सिडको हस्तांतरणाची प्रक्रिया रखडली आहे. यातच आता ही इमारत मोडकळीस आल्याने रहिवाशांसमोर तिच्या पुनर्बांधणीचा प्रश्न उभा ठाकला आहे. विकासक दाद देत नाहीत. अशा परिस्थितीत दाद कोणाकडे मागायची, असा सवाल येथील रहिवाशांना सतावत आहे.
दहा वर्षांतच ‘ती’ इमारत बनली धोकादायक
By admin | Published: September 09, 2016 3:24 AM