दोनच दिवसांत कैलास शिंदे पुन्हा सिडकोत आले
By कमलाकर कांबळे | Published: August 9, 2023 08:45 PM2023-08-09T20:45:10+5:302023-08-09T20:45:18+5:30
संजय काटकरांची कारकीर्द ठरली अवघ्या दोन दिवसांची कैलास शिंदे यांनी मागील दोन वर्षात सिडकोत अनेक महत्वपूर्ण प्रकल्पांवर यशस्वीरित्या काम केले आहे.
नवी मुंबई : सिडकोचे सह व्यवस्थापकीय संचालक कैलास शिंदे यांची गेल्या आठवड्यात उचलबांगडी करून त्यांच्या जागेवर नाशिक विभागाचे उपायुक्त (महसूल) संजय काटकर यांना आणले होते. त्यानुसार काटकर यांनी सोमवारी सिडकोत येवून आपल्या नव्या पदाचा पदभारही स्वीकारला. परंतु, अवघ्या दोन दिवसांत त्यांची मीरा-भाईंदर आयुक्त म्हणून बदली केली आहे. विशेष म्हणजे रिक्त झालेल्या पदावर पुन्हा कैलास शिंदे यांचीच वर्णी लावली आहे.
कैलास शिंदे यांनी मागील दोन वर्षात सिडकोत अनेक महत्वपूर्ण प्रकल्पांवर यशस्वीरित्या काम केले आहे. विशेषत: महामुंबई, नैना आणि सिडको क्षेत्रातील पाणीपुरवठ्याच्या प्रश्नांवर त्यांनी भरीव कार्य केले आहे. अशातच गेल्या आठवड्यात त्यांची अचानक बदली झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात होते. इतकेच नव्हे, बदलीनंतर आठ दिवस त्यांना आठ दिवस पोस्टिंग दिली गेली नाही. त्यामुळे प्रशासकीय वर्तुळात तर्कवितर्क लावले जात होते.