दोन तासांत सभा उरकली; तब्बल १२३ कोटींचे प्रस्ताव मंजूर
By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2019 11:38 PM2019-09-13T23:38:25+5:302019-09-13T23:38:47+5:30
११६ पैकी शेवटपर्यंत ३४ नगरसेवकच उपस्थित
नवी मुंबई : विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता कोणत्याही क्षणी लागण्याची शक्यता आहे. यामुळे महानगरपालिकेमध्ये विकासकामांचे प्रस्ताव मार्गी लावण्याची घाई सुरू झाली आहे. शुक्रवारी झालेल्या सर्वसाधारण सभेमध्ये तब्बल १२३ कोटी रुपयांचे ५४ प्रस्ताव चर्चा न करताच मंजूर करण्यात आले. ११६ नगरसेवकांपैकी शेवटपर्यंत फक्त ३४ नगरसेवकच उपस्थित होते.
नवी मुंबई महानगरपालिका प्रत्येक महिन्याच्या २० तारखेच्या दरम्यान सर्वसाधारण सभेचे आयोजन करत असते. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याची शक्यता असल्यामुळे सप्टेंबर महिन्याची सभा १३ सप्टेंबरलाच आयोजित करण्यात आली. सकाळी ११ वाजता सभा सुरू होणे अपेक्षित होते. परंतु नगरसेवक वेळेत उपस्थित न झाल्यामुळे दोन तास उशिरा सभेचे कामकाज सुरू झाले. साडेबारा वाजता फक्त १४ नगरसेवक उपस्थित होते. एक वाजता ११६ नगरसेवकांपैकी फक्त ६० नगरसेवक उपस्थित होते. विषय पत्रिकेवर प्रशासनाने पाठविलेले ९ विषय होते. आयत्या वेळी ४५ प्रस्ताव मांडण्यात आले. रोडचे काँक्रीटीकरण, पदपथ निर्मिती, उद्यानांची सुधारणा व इतर अनेक महत्त्वाचे विषय सभागृहात मांडण्यात आले. एकाही विषयावर चर्चा करण्यात आली नाही. सभागृह नेत्यांनी प्रस्ताव मांडले की तत्काळ मंजूर झाल्याची घोषणा करून दुसरा प्रस्ताव मंजुरीसाठी घेतला जात होता. एका प्रस्तावावर शिवसेना नगरसेवक सोमनाथ वास्कर यांनी बोलण्यासाठी हात वर केला, परंतु त्यांना बोलू न देता विषय मंजूर करण्यात आला. शेवटचे दोन प्रस्ताव मांडण्याची घोषणा करण्यात आली, परंतु त्या प्रस्तावांची विषयपत्रिकाही कोणाकडेच नव्हती. मात्र ती सर्वांना देण्यापूर्वीच विषय मंजूर करण्याची घोषणा करण्यात आली.
सर्वसाधारण सभा पावणेएक वाजता सुरू झाली व तीन वाजता दोन तासांमध्ये सर्व कामकाज संपविण्यात आले. यामधील अर्धा तास श्रद्धांजली वाहण्यासाठी व अर्धा तास प्रश्नोत्तराच्या तासाला देण्यात आला होता. ८ नगरसेवकांनी सभागृहात लेखी प्रश्न उपस्थित केले होते, परंतु फक्त दोनच नगरसेवकांना त्यांच्या प्रश्नांवर चर्चा करता आली. प्रश्नोत्तराचा तास संपल्याचे कारण देवून इतरांना बोलू दिले नाही.
नगरसेवकांनी मागणी करूनही वेळ वाढवून दिला नाही. प्रश्नोत्तरानंतर पुढील एक तासामध्ये तब्बल १२३ कोटी रुपयांचे प्रस्ताव मंजूर केले. सभेचे कामकाज पाहण्यासाठी आलेल्या नागरिकांनी याविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली. नगरसेवकांना विषयांचे गांभीर्य नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. निवडणुका होणार असल्यामुळे ही घाई करण्यात आली आहे. चर्चा झाली नसल्यामुळे प्रस्तावांमधील त्रुटींना जबाबदार कोण असा प्रश्नही यावेळी उपस्थित करण्यात आला.
नगरसेवकांची उदासीनता; नागरिकांकडूनही नाराजी व्यक्त
सर्वसाधारण सभेला अनेक नगरसेवकांनी दांडी मारली. सकाळी ११ वाजता सभेची वेळ होती, परंतु तेव्हा एकही नगरसेवक सभागृहात नव्हता. साडेबारा वाजता फक्त १४ नगरसेवक उपस्थित होते. पावणेएक वाजता ४५ व एक वाजता ६० नगरसेवक होते. पावणेतीन वाजता सभागृहात ३१ जणच उपस्थित होते. महापालिकेमध्ये १११ लोकनियुक्ती व ५ स्वीकृत असे एकूण ११६ नगरसेवक आहेत. सभा संपली तेव्हा फक्त ३४ जणच उपस्थित होते. यामुळे नागरिकांनीही नाराजी व्यक्त केली.
दोन कार्यकारी अभियंत्यांना नोटीस
शहर अभियंत्यांनी महापालिका कार्यक्षेत्रामधील खड्डे दुरुस्तीच्या कामामध्ये निष्काळजीपणा केल्याचा ठपका ठेवून कार्यकारी अभियंता संजय देसाई व अनिल नेरपगार यांना कारणे दाखवा नोटीस दिल्याचे सभागृहात सांगितले.
दोन्ही अधिकाऱ्यांना त्यांचे म्हणणे सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. समाधानकारक उत्तर न दिल्यास निलंबनाची कारवाईही केली जाईल, असेही सभागृहात स्पष्ट केले.
शिवसेना नगरसेवकाचा सभात्याग
सानपाडा येथील शिवसेना नगरसेवक सोमनाथ वास्कर यांना त्यांच्या प्रभागामधील विषयावर चर्चा करू दिली नाही. त्यांनी हात वर केला असतानाही प्रस्ताव घाईमध्ये मंजूर करण्यात आला. यामुळे संतप्त झालेल्या वास्कर यांनी विषयपत्रिका फेकून निषेध व्यक्त केला. त्यांनी व कोमल वास्कर यांनी या मनमानीचा निषेध करून सभात्याग केला.
नाल्यांच्या दुरवस्थेचे सभागृहात उमटले पडसाद
सीबीडीमधील नाल्याच्या दुरुस्तीच्या एकमेव प्रस्तावावर सभागृहात चर्चा झाली. रामदास पवळे, अशोक गुरखे, शुभांगी पाटील, शंकर मोरे, शशिकला पाटील, लता मढवी, सुरेखा नरबागे, कविता आंगोडे, रामचंद्र घरत, देविदास हांडे पाटील, प्रशांत पाटील, मुनावर पटेल, रवींद्र इथापे यांनी शहरातील नाले, भुयारी मार्ग व पादचारी पुलांच्या दुरवस्थेविषयी नाराजी व्यक्त केली. मागणी करूनही नाल्यांची कामे केली जात नसल्याचे निदर्शनास आणून दिले. महापौर जयवंत सुतार यांनीही सदस्यांनी मांडलेल्या भावना लक्षात घेवून नाले, पादचारी पूल व भुयारी मार्गांची कामे लवकर करण्याचे आदेश दिले.
सभागृहात कोरमही अपूर्ण
महापालिकेची सभा सुरू करण्यासाठी साधारणत: ३७ नगरसेवक सभागृहात असणे आवश्यक आहे. कोरम पूर्ण होत नसल्याने सभा दोन तास उशिरा सुरू झाली. सभेच्या शेवटच्या पंधरा मिनिटामध्ये कोरम पूर्ण होईल एवढेही संख्याबळ नव्हते. परंतु विरोधकांनीही आक्षेप घेतला नसल्याने सर्व विषय मंजूर करण्यात आले.