नवी मुंबई : महापालिकेने २०१३ मध्ये अग्निशमन दलामध्ये दोन वाहने खरेदी केली होती. परंतु चेसीसवर रेस्क्यू टेंडर बॉडी व १२ किलोमीटर क्षमतेचे २ नग वॉटर ब्राऊझर बॉडी बांधण्याचे काम रखडल्यामुळे या वाहनांचा वापर होऊ शकला नाही. याविषयी नगरसेवकांनी स्थायी समितीमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली. अग्निशमन दलामध्ये नवीन फायर फायटिंग वाहने खरेदी करण्यासाठी सर्वसाधारण सभेने जानेवारी २०१३ मध्ये प्रशासकीय मंजुरी दिली होती. यानंतर प्रशासनाने स्थायी समितीच्या मंजुरीनंतर आॅगस्ट २०१३ मध्ये ९९ लाख ४० हजार रुपये खर्च करून अशोक लेलँड कंपनीकडून चेसीस खरेदी केली व मान कंपनीकडूनही चेसीस खरेदी केली होती. दोन्ही वाहने अग्निशमन दलामध्ये आली, परंतु एका चेसीसवर रेस्क्यू टेंडर बॉडी व दुसऱ्यावर १२ किलोमीटर क्षमतेचे २ नग वॉटर ब्राऊझर बॉडी बांधण्याचे काम वेळेत केले नाही. यामुळे तब्बल दोन वर्षे ही वाहने नेरूळ अग्निशमन केंद्रामध्ये धूळखात पडून आहेत. चेसीसवर बॉडी बांधण्याचा प्रस्ताव गुरुवारी स्थायी समितीमध्ये मंजुरीसाठी आला होता. यावेळी सर्वपक्षीय नगरसेवकांनी तीव्र आक्षेप घेतला. दोन वर्षे विलंब का लागला, एका जागेवर उभ्या असणाऱ्या वाहनांचे टायर आता खराब झाले असतील. मान कंपनी बंद झाली असून त्याचे स्पेअर पार्ट मिळणार का, असे प्रश्न उपस्थित करण्यात आले. महापालिकेने चेसीस खरेदी केल्यानंतर लोकसभा, विधानसभा व नंतर आलेल्या महापालिकेच्या निवडणुकीमुळे बॉडी बांधण्यासाठीची निविदा प्रक्रिया वेळेत पूर्ण करता आली नाही. एका वाहनासाठी ५ वेळा निविदा मागविण्यात आली व दोन वेळा मुदतवाढ देण्यात आली. दुसऱ्या वाहनासाठी ६ वेळा निविदा मागविण्यात आल्या व २ वेळा मुदतवाढ दिली असल्याचे सांगितले. अग्निशमन दलात कर्मचाऱ्यांची कमतरतापालिकेच्या अग्निशमन दलामध्ये फक्त १४० कर्मचारी आहेत. कर्मचारी चांगल्याप्रकारे काम करत आहेत, परंतु अद्याप २५० ते ३०० कर्मचाऱ्यांची गरज आहे. कर्मचारी भरतीसाठी आकृतीबंध तयार करून तो शासनाकडे पाठविण्यात आला आहे. शासनाच्या मंजुरीनंतर कर्मचारी नियुक्त केले जातील, अशी माहिती प्रशासनाने यावेळी दिली.
अग्निशमन दलातील वाहने वापराविना
By admin | Published: July 27, 2015 11:45 PM