लोकार्पणानंतरही समाजमंदिर वापराविना; भोगवटा प्रमाणपत्र नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2020 12:27 AM2020-01-18T00:27:39+5:302020-01-18T00:27:58+5:30
सिडकोच्या वेळकाढू धोरणाचा कामोठेतील नागरिकांकडून निषेध
अरुणकुमार मेहत्रे
कळंबोली : कामोठे सेक्टर २१ मध्ये सिडकोने समाजमंदिर बांधले आहे. या समाजमंदिराचे लोकार्पण विधानसभा निवडणुकी आधीच, सप्टेंबर महिन्यात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले होते. इमारत बांधून दोन वर्षे झाली तरी समाजमंदिर कामोठेकरांसाठी खुले करण्यात आलेले नाही. नवीन वर्षात तरी समाजमंदिर वापरासाठी खुले करण्यात यावे, यासाठी एकता सामाजिक संस्थेकडून सिडको अधिकाऱ्यांना निवेदनासह तीळगूळ वाटप करण्यात आले आहे.
कामोठे वसाहतीत सेक्टर २१ येथे समाजमंदिराकरिता सिडकोने मोकळा भूखंड ठेवला होता. तो कित्येक वर्षे तसाच पडून होता. स्थानिक रहिवासी तसेच एकता सामाजिक संस्थेकडून केलेल्या पाठपुराव्यामुळे सिडकोने या जागेवर २०१८ मध्ये समाजमंदिर बांधले. दोन मजली इमारतीत तळमजल्यावर सभागृह बांधण्यात आले आहे. तर पहिल्या मजल्यावर अभ्यासिका, वाचनालय बांधण्यात आले. याशिवाय दुसºया माळ्यावर सभागृह आणि ओपन टेरेस आहे. इमारतीचे बांधकाम तसेच आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते लोकार्पण झाले असले तरी अद्याप समाजमंदिराला भोगवटा प्रमाणपत्र मिळालेले नाही. त्यामुळे ही वास्तू नागरिकांसाठी खुली केली नसल्याचे सिडकोकडून सांगण्यात येत आहे.
वाढत्या लोकवस्तीचा विचार करता वसाहतीत समाजमंदिराची आवश्यकता आहे. मात्र, सिडकोकडून वेळकाढू धोरण अवलंबले जात आहे. सिडकोचे अधीक्षक अभियंता सीताराम रोकडे यांच्या दालनात यासंदर्भात जवळपास आठ महिन्यांपूर्वी बैठक घेण्यात येऊन १५ दिवसांत समाजमंदिर नागरिकांसाठी खुले करण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, अद्याप समाजमंदिर वापरासाठी खुले करण्यात आलेले नाही. याचा निषेध नोंदवत बुधवारी, मकर संक्रांतीच्या औचित्याने, समाजमंदिर खुले व्हावे, यासाठी एकता सामाजिक संस्थेच्या कार्यकर्त्यांनी कामोठेतील सिडको अधिकाऱ्यांना निवेदनासह तीळगुळाचे वाटप करत अनोखे आंदोलन केले. या वेळी संस्थेचे अध्यक्ष अमोल शितोळे, मंगेश अढाव, सुनील करपे आदी उपस्थित होते.
समाजमंदिर बांधून दोन वर्षे झाली ही वस्तुस्थिती आहे. इमारतीचे लोकार्पण झाले आहे; पण भोगवटा प्रमाणपत्र मिळाले नाही. यामुळे ते नागरिकांकरिता खुले करण्यात आले नाही. या बाबत वरिष्ठांशी पाठपुरावा सुरू आहे. लवकरच कामोठेकरांसाठी समाजमंदिर खुले करण्यात येईल. - विलास बनकर, कार्यकारी अभियंता, सिडको