शहरातील पेट कॉर्नर वापराविना; सार्वजनिक ठिकाणी पाळीव प्राण्यांचा उपद्रव!
By योगेश पिंगळे | Published: February 1, 2024 04:59 PM2024-02-01T16:59:21+5:302024-02-01T16:59:34+5:30
महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
नवी मुंबई : शहरात पाळीव श्वानांची संख्या वाढली असून पाळीव प्राण्यांनी सार्वजनिक ठिकाणी शौच करू नये यासाठी नवी मुंबई महापालिकेने शहरातील विविध ठिकाणी ‘पेट कॉर्नर’ची व्यवस्था केली आहे. या ‘पेट कॉर्नर’मध्ये समुद्रकिनाऱ्यावरील वाळू टाकून पाळीव प्राण्यांच्या शौचाची सोय करण्यात आली असून यासाठी महापालिकेने लाखो रुपये खर्च केले आहेत. मात्र या ‘पेट कॉर्नर’चा वापर होत नसून पाळीव प्राणी रस्त्यावरच उपद्रव करत आहेत. याकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
स्वच्छ शहर म्हणून नवी मुंबई शहराने देशात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. स्वच्छ सर्वेक्षणाच्या निमित्ताने महापालिकेच्या माध्यमातून दरवर्षी वेगवेगळे उपक्रम राबविले जातात. नियोनजबद्ध नवी मुंबई शहरात पाळीव श्वानांची संख्या वाढत आहे. सकाळ-संध्याकाळ श्वानांना बाहेर फिरण्यास नेणारे नागरिक आपल्या पाळीव प्राण्यांनी सार्वजनिक ठिकाणी केलेले शौच उचलत नाहीत. त्यामुळे पाळीव श्वानांसाठी पेट कॉर्नर निर्माण करण्यात यावे, अशी मागणी काही श्वानप्रेमींकडून करण्यात आली होती. त्याची दखल घेऊन महानगरपालिकेने स्वच्छ सर्वेक्षण मोहीम राबविताना पाळीव प्राण्यांच्या शौचाची सोय उपलब्ध करून देण्यासाठी लाखो रुपये खर्च करून शहरात विविध ठिकाणी ‘पेट कॉर्नर’ उभारले आहेत. चौकोनी आकाराच्या खोलगट जागेत वाळू टाकून त्या ठिकाणी पेट कॉर्नरची निर्मिती करण्यात आलेली आहे. त्या परिसरातील नागरिकांनी आपल्या घरातील पाळीव प्राण्यांना शौचासाठी या पेट कॉर्नरच्या वाळू टाकलेल्या ठिकाणी घेऊन येणे अपेक्षित आहे. मात्र या ठिकाणी कोणीही नागरिक पाळीव प्राण्यांना घेऊन येत नसून शहरात सार्वजनिक जागेत श्वान शौच करत आहेत. याकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. पेट कॉर्नरच्या ठिकाणी प्राण्यांची विष्ठा उचलण्यासाठी आधुनिक प्रकारचे स्कूप, प्लास्टिक पिशव्या ठेवण्यात येणार होत्या, मात्र शहरातील बहुतांश पेट कॉर्नरवर अशा कोणत्याही सुविधा उपलब्ध नाहीत. वापर होत नसल्याने महापालिकेचे पेट कॉर्नरचे नियोजन फसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.