नवी मुंबई - नोकरीच्या बहाण्याने अनेकांना लाखोचा गंडा घालणाऱ्या टोळीतील महिलेला गुन्हे शाखा पोलिसांनी अटक केली आहे. या टोळीने अनेकांना आरपीएफच्या कॉन्स्टेबल पदाची बनावट नियुक्तीपत्रे देऊन कार्यालय बंद करून पळ काढला होता. त्यांनी इतरही अनेकांना अशा प्रकारे गंडवल्याची शक्यता असून पोलीस अधिक तपास करत आहेत.जयश्री दाते असे अटक केलेल्या महिलेचे नाव आहे. तिच्याविरोधात एपीएमसी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्याचा खंडणी विरोधी पथकामार्फत तपास सुरू होता. सदर महिला व तिच्या सहकाºयांनी आरीफ मुलानी या तरुणासह अनेकांना नोकरीच्या बहाण्याने गंडा घातला होता. आरपीएफच्या कॉन्स्टेबल व जे.एन.पी.टी.मध्ये नोकरीचे आमिष दाखवून पैसे घेतले होते. मुलानी याने देखील नोकरीसाठी ५ लाख ५० हजार रुपये दिले होते. त्यानुसार अनेक तरुणांना बनावट नियुक्तीपत्रे देऊन कार्यालय बंद करून त्यांनी पळ काढला होता. तर आपली नियुक्तीपत्रे बनावट असल्याचे निदर्शनास आल्यानंतर झालेल्या फसवणुकीची एपीएमसी पोलिसांकडे तक्रार केली होती. त्यानुसार उपआयुक्त तुषार दोशी, सहायक आयुक्त नीलेश राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ निरीक्षक शिरीष पवार, सहायक निरीक्षक विजय चव्हाण, नीलेश माने, सहायक उपनिरीक्षक शेखर तायडे, अनिल कदम यांचे पथक तपास करत होते.
फसवणूक प्रकरणी महिलेला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2018 5:05 AM