अटल सेतूवर महिलेचा जीव देण्याचा प्रयत्न; टॅक्सी चालक अन् पोलिसांच्या धाडसाने वाचले प्राण
By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2024 10:47 PM2024-08-16T22:47:32+5:302024-08-16T22:48:16+5:30
नवी मुंबईत अटल सेतूवर एका महिलेने आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे समोर आलं आहे.
नवी मुंबई : अटल सेतू पुलावरुन ५६ वर्षीय महिलेने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना शुक्रवारी संध्याकाळी घडली. पुलाच्या सुरक्षा कठड्याच्या पलिकडे ही महिला बसलेली होती. तिने खाडीत उडी मारली असता कार चालकाने तिचा हात पकडून ठेवला असता तीन वाहतूक पोलिसांनी कठड्यावर चढून तिचे प्राण वाचवले.
शुक्रवारी संध्याकाळी ७ वाजण्याच्या सुमारास हा हा प्रकार घडला. पुलावर धोकादायक ठिकाणी एक महिला जावून बसली असल्याची माहिती न्हावा शेवा वाहतूक पोलिसांना मिळाली होती. त्याचवेळी पुलावर वाहतूक शाखेचे ललित शिरसाठ, किरण म्हात्रे, यश सोनवणे हे व्हॅनमधून गस्त घालत होते. ते पुलावर कार उभी असलेल्या ठिकाणी गेले असता, धोकादायक ठिकाणी बसलेल्या महिलेने पुलावरून पाण्यात उडी मारली. त्यावेळी कारलगत उभ्या असलेल्या चालकाने धाडसाने त्या महिलेचा हात पकडून ठेवला. यामुळे महिला लटकत असतानाच तिनही वाहतूक पोलिसांनी सुरक्षा कठड्यावर चढून त्या महिलेला सुरक्षित बाहेर काढले. कार चालक व वाहतूक पोलिसांच्या धाडसामुळे या महिलेचे प्राण वाचू शकले आहेत. सदर महिला मुलुंड परिसरात राहणारी असून नैराशयात ती आत्महत्येच्या उद्देशाने त्याठिकाणी आली होती.