नवी मुंबई : भाड्याचे घर खाली केल्यानंतर घरमालकाला डिपॉजिट परत मागितल्याने महिलेला मारहाण झाल्याची घटना घडली आहे. मागील अनेक दिवसांपासुन ही महिला तिने दिलेले डिपॉजिट परत मागत असतानाही तिला ते न देता अत्याचार करण्याची धमकी देखील दिली जात होती. याप्रकरणी एनआयआर पोलिस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहाबाज गाव येथे शुक्रवारी रात्री ही घटना घडली आहे. परिसरात राहणारी 33 वर्षीय महिला व तिचे कुटुंबीय अमीर अन्सारी याच्या घरात भाड्याने रहायला होते. यासाठी त्यांनी 30 हजार रुपये डिपॉजिट दिले होते. एक महिन्यांपूर्वी त्यांनी अन्सारी याचे घर खाली करून त्याच इमारतीमध्ये भाड्याने दुसरे घर घेतले आहे. यामुळे त्यांनी ठरल्याप्रमाणे डिपॉजिटचे 30 हजार रुपये परत मागितले होते. परंतु अन्सारी याच्याकडून डिपॉजिटची रक्कम परत करण्यास नकार दिला जात होता. तर सतत पैसे मागितले जात असल्याने काही दिवसांपूर्वी त्याने घरात घुसून कुटुंबियांना मारहाण करून तक्रारदार महिला व तिच्या आईला अश्लील शिवीगाळ करत अत्याचार करण्याची धमकी दिल्याचाही आरोप आहे.
शुक्रवारी अमीर अन्सारी हा त्याचे घर दाखवण्यासाठी नवे भाडेकरू घेऊन आला होता. त्यावेळी तक्रारदार महिलेने पुन्हा त्याच्याकडे डिपॉजिटच्या रकमेची मागणी केली. या रागातून त्याने महिलेला मारहाण केली. यामध्ये तिला दुखापत झाली असून रुग्णालयात दाखल करण्यात आले असून उपचार सुरु आहेत. याप्रकरणी एनआरआय पोलिस ठाण्यात अमीर अन्सारी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान अन्सारी व त्याच्या कुटुंबियांपासून आपल्याला धोका असल्याचाही आरोप पीडित महिलेच्या कुटुंबीयांनी केला आहे.