नवी मुंबईत फसवणुकीच्या तक्रारीतही महिलेची फसवणूक
By सूर्यकांत वाघमारे | Published: February 9, 2024 06:30 PM2024-02-09T18:30:06+5:302024-02-09T18:30:55+5:30
खारघर येथे राहणाऱ्या ५० वर्षीय महिलेसोबत हा प्रकार घडला आहे. या महिलेला बिट कॉइनमध्ये गुंतवणूक करून नफा कमवण्याचा मॅसेज आला होता.
नवी मुंबई : ऑनलाईन फसवणुकीची ऑनलाईन तक्रार करतानाही महिलेची फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे. यामध्ये महिलेच्या खात्यातून २० लाख रुपये उडवण्यात आले आहेत. गुगलवर कस्टमर केअरचा नंबर शोधणे महिलेला चांगलेच महागात पडले आहे.
खारघर येथे राहणाऱ्या ५० वर्षीय महिलेसोबत हा प्रकार घडला आहे. या महिलेला बिट कॉइनमध्ये गुंतवणूक करून नफा कमवण्याचा मॅसेज आला होता. यावेळी महिलेने संबंधितांना टेलिग्रामवर संपर्क साधला असता ३ हजार रुपये गुंतवून ३० हजार रुपये कमवण्याचे त्यांना सांगण्यात आले होते. त्यांच्यावर विश्वास ठेवून महिलेने ३ हजार रुपये भरले होते. मात्र नफ्याची रक्कम देण्यासाठी टाळाटाळ होऊ लागल्याने आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.
फसवणूक करणाऱ्या विजय बिटकॉइन ट्रेडिंग कंपनी विरोधात तक्रार करण्यासाठी गुगलवर कस्टमर केअरचा नंबर शोधला. त्यामध्ये एक नंबर मिळाला असता त्यावर त्यांनी संपर्क साधला होता. यावेळी फोनवरील व्यक्तीने त्यांना मोबाईलमध्ये अव्वल डेस्क ऍप्लिकेशन डाऊनलोड करण्यास सांगून बँकेचे ऍप्लिकेशन वापरण्यास सांगितले. त्याच्यावर विश्वास ठेवून महिलेने बँकेचे ऍप्लिकेशन सुरु ठेवले असता फोनवरील व्यक्तीने परस्पर ऍप्लिकेशनचा अधिकार मिळवून खात्यातून २० लाख रक्कम काढून घेतले. यादरम्यान बँकेतून पैसे काढून घेतले जात असल्याचे सांगण्यासाठी त्यांना बँकेतून फोन येत असतानाही त्यांनी तो टाळल्याने गुन्हेगाराचा उद्देश साध्य झाला. याप्रकरणी महिलेच्या तक्रारीवरून सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.