रुग्णालयात गळफास घेऊन महिलेची आत्महत्या; नातेवाईकांकडून हत्येचा आरोप
By सूर्यकांत वाघमारे | Published: August 13, 2023 04:53 PM2023-08-13T16:53:26+5:302023-08-13T16:53:48+5:30
मृतदेहावर अंत्यविधीला केला नकार, जरीना यांनी शुक्रवारी दवाखान्यातून काही रक्कम चोरली होती असे डॉ. थदाणी यांनी पोलिसांना सांगितले आहे.
नवी मुंबई : नेरुळ येथील महिला डॉक्टरकडे काम करणाऱ्या महिलेने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. त्वचा स्पेशलीस स्नेहा थदाणी यांच्या दवाखान्यात शनिवारी सकाळी हि घटना घडली आहे. दरम्यान तिने आत्महत्या केली नसून तिची हत्या झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. यावरून त्यांनी रविवारी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार देत गोंधळ घातला. अखेर पोलिसांनी त्यांची समजूत काढून परिस्थिती नियंत्रणात आणली आहे.
जरीना शाह असे मृत महिलेचे नाव असून त्या नेरुळ सेक्टर ४ येथील डॉ. स्नेहा थदाणी यांच्याकडे कामाला होत्या. शनिवारी सकाळी रुग्णालयात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आल्या. यामुळे त्यांना कोपर खैरणेतील डॉ. थदाणी यांच्याच वडिलांच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार दरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याचे नातेवाईकांना कळवण्यात आले. हा प्रकार समजल्यानंतर नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेण्यास व अंत्यविधी करण्यास नकार दिला आहे. त्यावरून रविवारी रुग्णालयाबाहेर नातेवाईकांनी गर्दी करून प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला. जरीना यांची हत्या झाल्याचा नातेवाईकांचा आरोप आहे. तर नेरूळमध्ये घटना घडली असताना त्यांना तातडीने जवळपास अनेक रुग्णालये असतानाही त्याठिकाणी न नेता कोपर खैरणेला का नेले ? याबाबत देखील संशय व्यक्त केला आहे.
दरम्यान जरीना यांनी शुक्रवारी दवाखान्यातून काही रक्कम चोरली होती असे डॉ. थदाणी यांनी पोलिसांना सांगितले आहे. शनिवारी सीसीटीव्ही मधून हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर त्यांना एका खोलीत बसवून ठेवून चोरलेली रक्कम घरून मागवून घेण्यास सांगण्यात आले होते. यामुळे त्याच खोलीत त्यांनी गळफास लावून आत्महत्या केल्याचे रुग्णालय व्यवस्थापनाने पोलिसांना कळवले आहे. त्यानुसार रुग्णालयातील सीसीटीव्ही तपासण्यासाठी ताब्यात घेतले असल्याचे नेरुळ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक तानाजी भगत यांनी सांगितले. तसेच जरीना यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी डॉ. स्नेहा थदाणी विरोधात गुन्हा दाखल केला जाणार असल्याचेही भगत यांनी सांगितले. पोलिसांच्या या आश्वासनानंतर नातेवाईकांनी मृतदेहावर अंत्यविधीची तयारी दाखवल्याने परिस्थिती नियंत्रणात आली आहे.