कसाऱ्यात बिबट्याच्या हल्ल्यात तरुणी जखमी
By admin | Published: November 10, 2015 12:42 AM2015-11-10T00:42:24+5:302015-11-10T00:42:24+5:30
शुक्रवारी रात्री पेढ्याचापाडा येथे भरवस्तीत रात्री ८ च्या सुमारास शिरकाव करून नैसर्गिक विधीसाठी गेलेल्या रुगी धापटे (१८) या तरुणीवर हल्ला चढविला.
कसारा : शुक्रवारी रात्री पेढ्याचापाडा येथे भरवस्तीत रात्री ८ च्या सुमारास शिरकाव करून नैसर्गिक विधीसाठी गेलेल्या रुगी धापटे (१८) या तरुणीवर हल्ला चढविला. अचानक झालेल्या बिबट्याच्या हल्ल्यानंतर या तरुणीने बचावात्मक पवित्रा घेऊन आरडाओरड केली. तिच्यासोबत असलेल्या तिच्या बहिणीने तिला बिबट्याच्या तावडीतून सोडविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. सुमारे १५ ते २० मिनिटे बिबट्या व पीडित तरुणी यांच्यात झुंज सुरू असताना ग्रामस्थांनी त्याला पिटाळून लावण्यासाठी प्रयत्न केले. अखेर, २० मिनिटांच्या झुंजीनंतर सदर तरुणीने केलेल्या प्रतिकारामुळे त्याने धूम ठोकली. परिणामी, या हल्ल्यात पीडित तरुणी व तिची बहीण जखमी झाली आहे. या प्रकारानंतर वन विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्वरित घटनास्थळी धाव घेऊन जखमी तरुणीला कसारा प्राथमिक उपचारानंतर उपजिल्हा रुग्णालय शहापूर येथे दाखल केले.
दरम्यान, या प्रकारानंतर संतप्त ग्रामस्थांनी कसारा येथील वन विभागाच्या वनपरिक्षेत्र कार्यालयावर हल्ला करून तोडफोड केली. यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तर, घटनास्थळी कसारा पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने पुढील अनर्थ
टळला. (प्रतिनिधी)
याप्रकाराची माहिती कळताच शिवसेना आमदार व आदिवासी विकास कमिटीचे अध्यक्ष रुपेश म्हात्रे यांच्यासह माजी आमदार दौलत दरोडा तालुका प्रमुख मारुती धिर्डे यांनी पेढ्याचा पाडा येथे धाव घेऊन धापटे कुटुंबियांची भेट घेऊन त्यांना आर्थिक मदत केली. तसेच आदिवासी विकास प्रकल्पामार्फत २५ हजार रुपये मदत देण्याचे आश्वासन दिले. यावेळी युवा सेनेचे भाऊ दरोडा, रमेश भोईर, प्रवीण सूर्यराव, शिवसेनेचे कुलदीप धानके, सुभाष विशे, विठ्ठल भगत यांच्यासह तहसीलदार अविनाश कोष्टी, प्रकल्प अधिकारी उपस्थित होते. काशिनाथ पोकळा यांनीही धापटे कुटुंबियांची भेट घेऊन मदतीचा हात दिला.
दरम्यान, बिबट्याच्या धुमाकुळीमुळे वन विभागाने काही भागांत कॅमेरे, पिंजरे यासह वन कर्मचाऱ्यांची गस्त तैनात केली आहे. परंतु, अपुऱ्या साधनसामग्री व अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे गेल्या महिन्यापासून बिबट्या वन विभागाच्या हातावर तुरी देऊन इतरत्र धूम ठोकून वन्यजीव व लहान मुले, वयोवृद्ध यांना भक्ष्य करीत आहे. दरम्यान, या दुर्दैवी घटनेनंतर रात्री शहापूरचे आमदार पांडुरंग बरोरा यांनी कसारा प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन जखमी तरुणींची विचारपूस करून तिला तत्काळ मदत देण्याची सूचना वन विभागास केली.