अत्याचार करून केली महिलेची हत्या; रिक्षाचालकाला अटक
By सूर्यकांत वाघमारे | Published: April 5, 2023 03:32 PM2023-04-05T15:32:57+5:302023-04-05T15:33:38+5:30
तुर्भे एमआयडीसीतली घटना
लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई : अत्याचार करून महिलेची हत्या केल्याप्रकरणी तुर्भे एमआयडीसी पोलिसांनी एकाला अटक केली आहे. २२ मार्चला या महिलेचा मृतदेह अडवली भुतवली परिसरात आढळून आला होता. सदर महिलेची अद्याप ओळख पटली नसून ती बेघर असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.
अडवली भुतवली येथील डोंगर भागात अज्ञात महिलेचा मृतदेह आढळून आला होता. डोक्यात सिमेंटचा ब्लॉक मारून तिची हत्या करण्यात आली होती. घटनास्थळी तिची पिशवी आढळली असता त्यात तिचे दोन जोडी कपडे आढळून आले होते. हत्येचा उलगडा करण्यासाठी वरिष्ठ निरीक्षक रवींद्र दौंडकर यांनी निरीक्षक संजय जोशी, सहायक निरीक्षक प्रभाकर शिऊरकर, पवन नांद्रे, अशोक डमाळे, राजेंद्र घेवडेकर, महेंद्र डोके आदींचे पथक केले होते. त्यांनी सदर मार्गावरून गेलेल्या वाहनांची माहिती मिळवली असता एका संशयित रिक्षाची माहिती मिळाली होती. त्याद्वारे सीसीटीव्ही तपासले असता सदर रिक्षातून या महिलेने प्रवास केल्याचे दिसून आले. त्याद्वारे पोलिसांनी रिक्षाचा शोध घेऊन मोहम्मद अहमद मोहम्मद अली साईन (३६) याला अटक केली आहे. तो दहिसर मोरी गावचा राहणारा असून रिक्षाचालक आहे.
२२ मार्चला तुर्भे स्टोअर येथून हि महिला त्याच्या रिक्षात बसली होती. त्यानंतर काही अंतरावरील एका देशी दारूच्या दुकानाबाहेरून मोहम्मद याने दारूची बाटली, पाण्याची बाटली व खाण्याचे साहित्य खरेदी केल्याचेही तपासात समोर आले आहे. अडवली भुतवली येथील निर्मनुष्य ठिकाणी मोहम्मद याने तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर घटनास्थळीच पडलेला सिमेंटचा ब्लॉक तिच्या डोक्यावर मारून तिची हत्या करून पळ काढला होता. सदर महिलेची अद्याप ओळख पटलेली नसून शरीरसंबंध करण्यासाठीच ती आपल्यासोबत रिक्षात आल्याचे मोहम्मद याने पोलिसांना सांगितले आहे. मात्र शरीरसंबंध केल्यानंतर तिने १ हजार रुपयांची मागणी केल्याने व पैसे न दिल्यास रस्त्यावर जाऊन आरडा ओरडा करण्याची धमकी दिल्याने हत्या केल्याची कबुली त्याने दिली आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"