नवी मुंबई: तुर्भे येथील द फर्न हॉटेलमध्ये आपला छळ होत असल्याची तक्रार महिला कामगाराने मनसेकडे केली होती. त्याद्वारे मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी त्याठिकाणी धडक देऊन प्रशासनाला धारेवर धरले. यावेळी शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी पोलिसांसमक्ष एका हॉटेल अधिकाऱ्याच्या श्रीमुखात लगावून घडलेल्या कृत्याचा जाब विचारला.
हॉटेलमध्ये शेफचे काम करणाऱ्या महिलेने मनसे शहर अध्यक्ष गजानन काळे यांच्याकडे तक्रार केली होती. त्यावरून काळे यांच्यासह मनसेचे पदाधिकारी मंगळवारी दुपारी तुर्भेतील द फर्न हॉटेलमध्ये धडकले होते. त्यांनी सदर महिला कामगाराचा छळ झाल्याप्रकरणी प्रशासनाला धारेवर धरले. याची माहिती मिळताच एपीएमसी पोलिसांचे पथक देखील त्याठिकाणी धडकले होते. दरम्यान हॉटेल अधिकाऱ्यांकडून समाधानकारक माहिती दिली जात नसल्याने काळे यांनी एका उपस्थित हॉटेल अधिकाऱ्याच्या श्रीमुखात लगावली.
दरम्यान तक्रारदार महिला हिचे गैरवर्तन होते असे हॉटेल मॅनेजमेंटचे म्हणणे आहे. परंतु हॉटेलमधील दोन सहकारी आपल्याला जाणीवपूर्वक स्पर्श करून त्रासदायक कामे करायला सांगायचे असे तक्रारदार महिलेचे म्हणणे आहे. याप्रकरणी हॉटेलमधील दोन कर्मचाऱ्यांना एपीएमसी पोलिसांनी ताब्यात घेतले असून रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.