डंपरखाली चिरडून महिलेचा मृत्यू
By admin | Published: September 17, 2016 02:28 AM2016-09-17T02:28:46+5:302016-09-17T02:28:46+5:30
देवदर्शनासाठी जाणाऱ्या दांपत्याच्या मोटारसायकलचा अपघात होवून महिलेच्या मृत्यूची घटना शुक्रवारी वाशी खाडीपुलावर घडली
नवी मुंबई : देवदर्शनासाठी जाणाऱ्या दांपत्याच्या मोटारसायकलचा अपघात होवून महिलेच्या मृत्यूची घटना शुक्रवारी वाशी खाडीपुलावर घडली. डंपरला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात मोटारसायकल पुलाच्या सुरक्षा कठड्याला धडकल्याचे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे. याप्रकरणी वाशी पोलिसांनी डंपर चालकाला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
भागवंती जैन (४३) असे अपघातामध्ये मृत पावलेल्या महिलेचे नाव आहे. त्या सानपाडा येथील राहणाऱ्या आहेत. शुक्रवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास पती दिनेशकुमार यांच्यासोबत त्या मोटारसायकलवरून (एमएच ४३ ए.एस.५२०९) गोवंडी येथील जैन मंदिरात चालल्या होत्या. दरम्यान, वाशी खाडीपुलावर त्यांचा अपघात झाला. समोर चाललेल्या डंपर व पुलाचा सुरक्षा कठडा यामधून मोटारसायकल पुढे नेण्याचा प्रयत्न दिनेशकुमार करत होते. यादरम्यान डंपरच्या पाठच्या भागाचा धक्का लागून त्यांची मोटारसायकल पुलाच्या सुरक्षा कठड्याला धडकली. त्यामुळे पाठीमागे बसलेल्या भागवंती ह्या खाली कोसळल्या असता डंपरचे पाठचे चाक त्यांच्या अर्ध्या अंगावरून गेले. यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यामुळे संतप्त झालेल्या दिनेशकुमार यांनी दगडाने डंपरची काच फोडून रोष व्यक्त केला. त्यामुळे डंपर चालकाने डंपर रस्त्यावरच सोडून घटनास्थळावरून पळ काढला. यामुळे वाशी खाडीपुलावर मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. वाहनांच्या लागलेल्या रांगा व अपघाताची माहिती मिळताच वाशी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर अपघातग्रस्त वाहने मार्गावरून हटवल्यानंतर सुमारे अर्ध्या तासाने पुलावरील वाहतुक सुरळीत झाली.
सदर अपघाताची नोंद वाशी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. तसेच पळालेल्या डंपर चालकाला देखील ताब्यात घेतले असून पोलीस त्याची अधिक चौकशी करत आहेत. (प्रतिनिधी)