महिलांच्या स्वच्छतागृहात पुरुषांना दिली परवानगी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2019 01:20 AM2019-04-26T01:20:31+5:302019-04-26T01:20:50+5:30
पनवेल महापालिकेचा अजब कारभार : झवेरी बाजार परिसरात येणाऱ्या महिलांची कुचंबणा
पनवेल : शहरात झवेरी बाजारात पनवेल महापालिकेने उभारलेल्या महिलांच्या स्वच्छतागृहात सर्रास पुरुष मंडळींना परवानगी देण्याचा अजब कारभार पाहावयास मिळत आहे. शहराच्या मध्यवर्ती ठिकाण असलेल्या झवेरी बाजारात हे स्वच्छतागृह आहे .
पनवेलमधील झवेरी बाजार परिसरात नेहमीच वर्दळ असते. याठिकाणी भाजी मार्केट, सराफा बाजार, कपडे, भांड्याची दुकाने असल्याने महिलावर्गाचा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात राबता असतो. शहराबरोबरच आजूबाजूच्या गावांतील नागरिकही या ठिकाणी खरेदीसाठी येतात. महिलांसाठी असलेल्या स्वच्छतागृहाच्या साफसफाईसाठी नियुक्त कर्मचाऱ्यांकडून या ठिकाणी पुरुषांनाही परवानगी देण्यात येत आहे. त्यामुळे महिलांची कुचंबणा होत आहे.
स्वच्छतागृहात पाणी नसल्यानेही गैरसोय होत आहे. येथील कर्मचारी महिलांशी उद्धटपणे वागतात. पालिकेच्या माध्यमातून या प्रकारावर आळा घालण्याची मागणी केली जात आहे. स्वच्छतागृहात आजूबाजूच्या दुकानदारांनी सिलिंडरसह अन्य सामान ठेवले आहे. यासंदर्भात पालिकेचे स्वच्छता निरीक्षक शैलेश गायकवाड यांच्याकडे विचारणा केली असता, संबंधित प्रकाराची माहिती घेऊन कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
पोलीस निवारा केंद्रही रिकामे
नवी मुंबई पोलीस आयुक्तालयामार्फत अनेक ठिकाणी पोलीस निवारा केंद्रे सुरू केली आहेत. शहरातील समस्या अथवा अनुचित प्रकार घडल्यास त्वरित पोलिसांची मदत मिळेल, यादृष्टीने हे निवारा केंद्र सुरू करण्यात आले आहेत. झवेरी बाजार परिसरात स्वच्छतागृहालगतच पोलीस निवारा केंद्र आहे. मात्र, या ठिकाणी पोलीस क्वचितच असतात.