पाण्यासाठी महिलांची जिल्हा परिषदेवर धडक
By admin | Published: May 3, 2017 05:57 AM2017-05-03T05:57:43+5:302017-05-03T05:57:43+5:30
खंडाळे ग्रामपंचायतीमधील पाण्यासाठी वणवण करणाऱ्या महिलांनी मंगळवारी थेट जिल्हा परिषदेवर धडक दिली. जिल्हा परिषदेचे
अलिबाग : खंडाळे ग्रामपंचायतीमधील पाण्यासाठी वणवण करणाऱ्या महिलांनी मंगळवारी थेट जिल्हा परिषदेवर धडक दिली. जिल्हा परिषदेचे पाणीप्रश्नी कसे दुर्लक्ष होत आहे याचे गाऱ्हाणेच त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश नार्वेकर यांच्याकडे मांडले. मात्र प्रशासनाने त्यांच्या हंड्यात आश्वासनाचेच पाणी टाकले.
अलिबाग शहरापासून दोन किलोमीटरच्या अंतरावर असलेल्या खंडाळे ग्रामपंचायत हद्दीत गेल्या महिनाभरापासून भीषण पाणीटंचाई जाणवत आहे. महिन्यातून दोनदाच ग्रामस्थांना पिण्याचे पाणी मिळत असल्याने महिला कमालीच्या संतापलेल्या होत्या. ग्रामपंचायत प्रशासनाला जागे करण्यासाठी सुमारे ६० महिलांनी एकत्र येत जिल्हा परिषदेवर धडक दिली. त्यानंतर त्यांनी जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी यांची भेट घेतली. मुख्यकार्यकारी अधिकारी नार्वेकर यांनी त्यांच्या व्यथा ऐकून घेत यावर लवकरच निर्णय घेत पाण्याचा प्रश्न सोडविला जाईल असे सांगितले. गेली अनेक वर्षे शेतकरी कामगार पक्षाच्या ताब्यात ही ग्रामपंचायत आहे. या पक्षाच्या नेत्यांचेही याकडे दुर्लक्ष झाल्याने या ग्रामपंचायात हद्दीत भीषण पाणीटंचाईला ग्रामस्थांना सामोरे जावे लागत असल्याचा आरोप त्यांनी केला. रोजगारासाठी बाहेर जावे की पाण्याची वाट पाहत दररोज बसावे, असा रोजचा प्रश्न येथील महिलांपुढे आहे.
पाणी सोडणाऱ्या कर्मचाऱ्याला पाणी कधी येणार असे महिलांनी विचारताच पाणी जेव्हा येईल तेव्हा भरा अशी उद्धटपणे उत्तरे मिळत असल्याचेही नार्वेकर यांना सांगितले.
मागील वर्षी अलिबाग पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्याने ग्रामसभा घेऊन पाणीप्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे आश्वासन ग्रामस्थांना दिले होते. त्याला वर्ष उलटूनही अजूनही पाण्याचा प्रश्न सुटलेला नाही. त्यामुळेच खंडाळे ग्रामपंचायत हद्दीतील महिलांनी जिल्हा परिषदेवर धाव घेतली होती. गेली अनेक वर्षे पाणीप्रश्नाला आम्हाला सामोरे जावे लागत आहे. पाण्यासाठी दरवर्षी आम्ही महिला एकत्र येऊन ग्रामपंचायतीवर मोर्चाही काढतो. मात्र हे निर्ढावलेले ग्रामपंचायत प्रशासन आम्हास दाद देत नाही. आज आम्हास शुध्द पिण्याचे पाणी मिळत नसल्याने अनेक व्याधींना सामोरे जावे लागत आहे. याबरोबरच उद्योगधंदा व नोकरी करणाऱ्या या महिलांना पाण्यासाठी घरी थांबावे लागत असल्याची माहिती लीला म्हात्रे यांनी दिली.(प्रतिनिधी)
सर्वाधिक टंचाईग्रस्त ४८ गावे
वाढत्या तापमानाबरोबर पाणीटंचाईची झळ यंदा जिल्ह्यातील ३६७ गावे आणि १ हजार १०९ वाड्यांमधील ग्रामस्थांना बसणार आहे. जिल्ह्यातील या सर्व टंचाईग्रस्त गाव-वाड्यांतील ग्रामस्थांची तहान भागविण्याकरिता तब्बल ६ कोटी २५ लाख १० हजार रुपये जिल्हा प्रशासनाला खर्च करावे लागणार आहे. यंदाचा टंचाई निवारण आराखडा तयार करण्यात आला असून तो राज्य सरकारला पाठविण्यात आला आहे.
जिल्ह्यातील पाणीटंचाईग्रस्त ३६७ गावांपैकी सर्वाधिक टंचाईग्रस्त ४८ गावे तर टंचाईग्रस्त एकूण १ हजार १०९ वाड्यांपैकी सर्वाधिक २७२ वाड्या या एकट्या पोलादपूर तालुक्यामध्ये आहेत. पोलादपूरशेजारील महाड तालुक्यात ३६ गावे तर २२० वाड्या टंचाईग्रस्त आहेत.
महाड-पोलादपूर बरोबरच कर्जत तालुक्यात देखील मोठे जलदुर्भिक्ष जाणवत असून या तालुक्यात ४४ गावे तर ३७ वाड्या टंचाईग्रस्त आहेत. टंचाईमुक्त झालेल्या अलिबाग तालुक्यात देखील तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे.
गावांबरोबरच ७१ वाड्यांमध्ये पाणीप्रश्न गंभीर झाला आहे. पेण तालुक्यातील ग्रामीण व दुर्गम भागातील जलदुर्भिक्ष यंदाही कायम असून, पेण तालुक्यातील १५४ वाड्यांबरोबरच ३९ गावांमध्ये पाणीटंचाई आहे.