Manda Mhatre: 'होय, स्वपक्षाकडूनच महिलांना डावललं जातं!', भाजपा आमदार मंदा म्हात्रेंचं रोखठोक विधान
By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2021 12:09 PM2021-09-04T12:09:19+5:302021-09-04T12:10:48+5:30
Manda Mhatre: राजकारणात स्वपक्षीय नेत्यांकडूनच महिलांचा योग्य सन्मान होत नसल्याचा गंभीर आरोप भाजपाच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी केला आहे.
Manda Mhatre: राजकारणात स्वपक्षीय नेत्यांकडूनच महिलांचा योग्य सन्मान होत नसल्याचा गंभीर आरोप भाजपाच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी केला आहे. मंदा म्हात्रेंच्या या विधानामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. महत्त्वाचं म्हणजे मंदा म्हात्रेंनी ही खंत राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांच्यासमोरच बोलून दाखवली आहे.
भिवंडीच्या शारदा म्हात्रे यांचा लोकमत वुमन अचिव्हर्स अवार्ड पुरस्काराने सन्मान
भिवंडीच्या समाजसेविका तसेच ठाणे जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या शारदा सुरेश म्हात्रे यांच्या सामाजिक कार्याची दखल प्रसिद्ध दैनिक लोकमतने घेतली असून शारदा म्हात्रे यांचा लोकमत वुमन अचिव्हर्स अवॉर्डने शुक्रवारी सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाला राज्याच्या महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर, मुंबईच्या महापौर किशोरीताई पेडणेकर, आमदार मंदा म्हात्रे , प्रसिद्ध अभिनेत्री उर्मिला मातोंडकर, अभिनेत्री तेजश्री प्रधान , अभिनेत्री श्रेया बुगडे उपस्थित होत्या. यावेळी मंदा म्हात्रे यांनी व्यासपीठावर यशोमती ठाकूर यांच्या उपस्थितीतच भाजपावर हल्लाबोल करत पक्षाला घरचा आहेर दिला आहे.
दोनदा विधानसभेवर निवडून आल्यानंतरही पक्षाकडून डावललं जातं. २०१९ च्या निवडणुकीत आपण अपक्ष लढण्याचे संकेत पक्षाला दिले होते. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत स्वतःच्या कामावर निवडून आले, असा दावा मंदा म्हात्रे यांनी केला आहे.
नेमकं काय म्हणाल्या मंदा म्हात्रे?
"महिलांना प्रचंड संघर्ष करावा लागतो. मी पहिल्या वेळी निवडून आले तेव्हा मोदींची लाट होती म्हटलं गेलं. मी दुसऱ्यांदा देखील निवडून आले. आता तर मोदींची लाट नव्हती ना? ते माझं काम होतं, माझं कर्तृत्त्व होतं. पण महिलांनी केलेलं काम झाकून टाकायचं, त्यांच्या बातम्या येऊ द्यायच्या नाहीत असे प्रकार होतात", असं मंदा म्हात्रे म्हणाल्या.
VIDEO: 'होय, स्वपक्षाकडूनच महिलांना डावललं जातं!', भाजपा आमदार मंदा म्हात्रेंचं रोखठोक विधान pic.twitter.com/i0kT0AfiNe
— Lokmat (@MiLOKMAT) September 4, 2021
"मी कोणालाही घाबरत नाही. मला कोणाला घाबरायची गरज नाही. मी नेहमी स्पष्टच बोलते. मला तिकीट द्या किंवा नका देऊ. मी लढणार म्हणजे लढणार. इतर पक्ष असतात ना आपल्याला साथ द्यायला", असंही त्या म्हणाल्या.
"राजकारणात महिलांना यश मिळू लागल्यानंतर स्वपक्षातील नेत्यांकडूनच महिला नेत्यानेच पंख छाटले जातात, मात्र आपण कधीही स्वतःला कमी समजू नये", असं म्हणत मंदा म्हात्रे यांनी मनातली खदखद व्यक्त केली आहे.