छत कोसळल्याने महिला जखमी
By Admin | Published: July 2, 2017 06:27 AM2017-07-02T06:27:14+5:302017-07-02T06:27:14+5:30
चार दिवसांपासून जोरदार वाऱ्यांसह कोसळणाऱ्या पावसामुळे शुक्रवारी रात्री ऐरोली सेक्टर-२ येथील एका घराच्या छताचे पत्रे कोसळल्याने
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : चार दिवसांपासून जोरदार वाऱ्यांसह कोसळणाऱ्या पावसामुळे शुक्रवारी रात्री ऐरोली सेक्टर-२ येथील एका घराच्या छताचे पत्रे कोसळल्याने त्यात एक वृद्ध महिला जखमी झाली आहे. राधाबाई अशोक वाघमारे (७६), असे या वृद्धेचे नाव आहे. तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी सेक्टर १५ मधील दक्षिणात्य गृहनिर्माण सोसायटीतील एका घराच्या छताचे प्लास्टर निखळल्याची घटना घडली होती. या घटनांमुळे परिसरातील रहिवाशांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
जोरदार वाऱ्यांसह कोसळणाऱ्या पावसाचा जोरदार फटका ऐरोली, दिघा परिसरातील रहिवाशांना बसला आहे. दिघ्यातील यादवनगर येथील मुख्य नाल्यात मोठ्या प्रमाणात डेब्रिज पडल्याने पाण्याचा निचरा होण्यास अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे परिसरातील रहिवाशांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे.
ऐरोली सेक्टर-२मधील बी-४२0 मध्ये राधाबाई वाघमारे मागील काही वर्षांपासून भाडेतत्त्वावर राहतात. नियमित डागडुजीअभावी घराची दुरवस्था झाली आहे. पावसाळ्यापूर्वी घराचे पत्रे बदलण्याच्या सूचना त्यांनी घरमालकाला केली होती; परंतु घरमालक गावी राहत असल्याने पावसाळ्याअगोदर हे काम होऊ शकले नाही. यातच शुक्रवारी पावसाने दमदार हजेरी लावल्याने मोडकळीस आलेले घराचे पत्रे उडून खोलीत पहुडलेल्या राधाबार्इंच्या अंगावर पडले. त्यामुळे त्यांच्या डोक्याला आणि पाठीला दुखापत झाली आहे. या घटनेचे वृत्त समजताच, स्थानिक नगरसेवक संजू वाडे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पावसाळ्यात आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी महापालिकेची सर्व यंत्रणा सज्ज आहे. त्यानुसार सदर कुटुंबाला आपत्कालीन मदत निश्चित केली जाईल, असे महापालिकेचे कार्यकारी अभियंता संजय देसाई यांनी सांगितले.