चालकाच्या निष्काळजीमुळे महिला जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2018 12:58 AM2018-10-15T00:58:54+5:302018-10-15T00:59:11+5:30
रबाळेतील प्रकार : एनएमएमटीचा प्रवाशांच्या जीवाशी खेळ
नवी मुंबई : चालकाच्या निष्काळजीमुळे एनएमएमटीच्या बसमधून उतरत असलेली वृद्ध महिला पडून जखमी झाल्याची घटना रबाळेत घडली आहे. याप्रकरणी बस चालकाला पोलिसांनी समन्स बजावून महिलेला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे. एनएमएमटीच्या चालकांना सतत प्रशिक्षण देऊन देखील त्यांच्याकडून प्रवाशांच्या जीवाशी खेळ होत असल्याचा संताप व्यक्त होत आहे.
प्रवाशांच्या सुरक्षेकरिता बस चालवताना घ्यायच्या खबरदारीबाबत एनएमएमटी प्रशासनाकडून सतत बस चालक व वाहकांना प्रशिक्षण दिले जाते. त्यानंतरही कोणत्या ना कोणत्या कारणाने एनएमएमटी प्रशासन वादात येत आहे. त्यापैकी बहुतांश कारणे बसच्या दुरुस्तीची असून, चालकांचाही निष्काळजीपणा समोर येऊ लागला आहे. असाच प्रकार रविवारी दुपारी ठाणे-बेलापूर मार्गावर रबाळे येथे घडला. १०० क्रमांकाची बस (एमएच ४३ एच ५५०८) ही मुलुंडच्या दिशेने जात होती. ही बस रबाळे नाका येथे आली असता बसमधील वृद्ध महिला त्याठिकाणी उतरण्यासाठी मध्यभागातील दरवाजाजवळ आली. परंतु महिला बसमधून उतरत असतानाच चालकाने त्याकडे दुर्लक्ष करून बस पुढे नेली असता तोल जाऊन महिला रस्त्यावर पडली. या वेळी बसचे मागचे चाक तिच्या अंगावरून जाण्यापूर्वीच बसथांब्यावरील दक्ष नागरिकांनी त्यांना खेचून बाजूला केले.
या घटनेमुळे संतप्त नागरिकांनी बस अडवून चालकाला त्याच्या बेशिस्तीवरून धारेवर धरत पोलिसांच्या ताब्यात दिले. त्यानुसार पोलिसांनी जखमी महिलेला वाशीतील पालिका रुग्णालयात दाखल केले असून चालकाला समन्स बजावला आहे. तर या घटनेचा आढावा घेऊन सदर चालकाचा दोष असल्यास त्यावर कारवाई केली जाणार असल्याचे परिवहन व्यवस्थापक शिरीष आरदवाड यांनी सांगितले.