लोकमत न्यूज नेटवर्कपनवेल : गावात एक लाख लिटर पाणी साठवण क्षमतेची टाकी असतानाही लाडीवलीकरांना पाणी नसल्याने १५ मार्च रोजी महिलांनी पंचायत समिती कार्यालयावर मोर्चा काढण्याचा निर्धार केला आहे.पनवेल तालुक्यातील लाडीवली येथील महिला स्वयंसहायता बचत गट आणि ग्राम संवर्धन सामाजिक संस्थेच्या वतीने रायगड जिल्हा परिषद शाळा लाडीवली येथे जागतिक महिला दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
महिला दिनानिमित्त ग्रामीण भागातील महिलांसाठी पाककला स्पर्धा,महिला अत्याचार प्रतिबंधक कायदा व ग्रामपंचायतीचा ग्रामनिधी आणि १५व्या वित्त आयोगातून करावयाच्या विकासकामांबाबत ग्राम संवर्धन सामाजिक संस्थेच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर यांनी मार्गदर्शन केले तर सामाजिक कार्यकर्त्या केशर पाटील,मालती म्हात्रे, व रा. जि. प.शाळा लाडीवलीच्या मुख्याध्यापिका शिवानी सावंत, राजेश रसाळ, आणि सुभाष शिगवण यांच्या हस्ते पाककला स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस देण्यात आले. मात्र संतोष ठाकूर १५ व्या वित्त आयोगाबाबत पी.पी.टी द्वारे मांडणी करीत असताना शासन निर्णयाप्रमाणे १५व्या वित्त आयोगातून ग्रामपंचायतीस येणाऱ्या बंधीत निधीतून पन्नास टक्के निधी हा पाणी व स्वच्छतेसाठी वापरणें बंधनकारक असल्याचे सांगताच उपस्थित महिलांमध्ये कुजबुज सुरू झाली. काही क्षणातच उपस्थित महिला आक्रमक झाल्या आणि यांनी आमच्या गावात तर आठ ते दहा दिवसांनी एकदा पाणी येत तेही दूषित आणि तरीही १०० रुपये पाणीपट्टी घेतली जात असल्याचे महिलांनी सांगितले.
ग्रामपंचायतीच्या उपाययोजना अपुऱ्यापाणी प्रश्नाबाबत ग्रामपंचायत कोणतीही उपाययोजना करत नसल्याची खंत व्यक्त करीत फक्त लाडीवलीच नव्हे तर शेजारीच असलेल्या दोन आदिवासी वाड्यांमध्येही पाण्याची दुर्भिक्ष्य असल्याचे सांगत गावात सुमारे तीस हजार लिटर साठवण क्षमतेची पाण्याची टाकी असतानाही आमच्या गावाला व आजूबाजूला असलेल्या आदिवासी वाड्यांना पाणी दिले जात नाही.मात्र हे पाणी शेजारी असलेल्या फार्महाऊर्सेसना प्राधान्याने दिले जात असल्याचा आरोप येथील महिलांनी केला.