पनवेल : नवीन पनवेलमध्ये पाणी येत नसल्याने येथील महिला मंगळवारी सिडको कार्यालयावर धडकल्या. महिलांनी कार्यालयाचे गेट आडवून धरल्यावर सिडकोचे कार्यकारी अभियंता या विषयावर चर्चा करण्यासाठी नागरिकांपुढे आले.
नवीन पनवेलमधील सिडको वसाहतीत गेले अनेक दिवस पाण्याची समस्या सुरू आहे. प्रभाग १७ मधील ए टाइपमध्ये ५-६ दिवस पाणी पुरेशा दाबाने येत नसल्याने अनेक कुटुंबांना पाणी मिळत नाही. त्यामुळे येथील महिलांनी थेट सिडको कार्यालयावर धडक दिली. कार्यालयात कोणी वरिष्ठ अधिकारी उपस्थित नव्हते. महिलांनी अधिकारी आल्याशिवाय उठणार नसल्याचा हट्ट धरल्यावर कोकण भवनवरून कार्यकारी अभियंता गजानन दलाल यांनी येऊन चर्चा केली. यावेळी त्यांनी आपल्याला ३२ एमएलटी पाणी आवश्यक असताना, एमजीपीकडून २६ एमएलटी पाणी मिळते. त्यातच आज फक्त २१ एमएलटी पाणी मिळाले. ही पाइप लाइन बदलण्याची गरज आहे. त्याचे टेंडर मंजूर झाले आहे. त्या लाइन बदलल्यावर आपला पाण्याचा प्रश्न सुटेल, असे सांगितले. पाणी येणार नसल्यास ग्राहकांना सूचना दिली जात नसल्याची ही तक्रार करण्यात आली. मंगळवार संध्याकाळपर्यंत ज्या नागरिकांना पाणी मिळणार नाही. अशा नागरिकांना टँकरने पाणीपुरवठा करण्याचे आश्वासन कार्यकारी अभियंता दलाल यांनी दिले.