वाशीतून महिला पोलीस बेपत्ता
By admin | Published: August 6, 2015 12:34 AM2015-08-06T00:34:50+5:302015-08-06T00:34:50+5:30
कामोठे पोलीस ठाण्यातील महिला कर्मचारी मंगळवार रात्रीपासून बेपत्ता झाली आहे. तिची स्कूटी वाशी खाडीपुलावर आढळली असून बॅगमध्ये चिठ्ठीही सापडली आहे.
नवी मुंबई : कामोठे पोलीस ठाण्यातील महिला कर्मचारी मंगळवार रात्रीपासून बेपत्ता झाली आहे. तिची स्कूटी वाशी खाडीपुलावर आढळली असून बॅगमध्ये चिठ्ठीही सापडली आहे. खाडीमध्ये शोध घेऊनही तिचा अद्याप शोध लागलेला नाही.
कामोठे पोलीस ठाण्यात नेमणूक असलेली प्राची वाघ (२६) ही महिला कर्मचारी मंगळवार रात्री १०.४५ वा.पासून बेपत्ता झाली आहे. तिची स्कूटी वाशी खाडीपुलावर आढळली. वाशी पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता स्कूटीवर लटकवलेल्या बॅगमध्ये प्राचीचे ओळखपत्र, मोबाइल व इतर वस्तू आढळल्या. तसेच पर्समधील ५०० रुपयांच्या नोटेवर लिहिलेली चिठ्ठी देखील पोलिसांच्या हाती लागली. यावरून तिने पुलावरून उडी मारून आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांना आला. वाशी पोलिसांनी अग्निशमन दलाच्या मदतीने खाडीत शोध घेतला. परंतु पहाटेपर्यंत शोध घेऊनही जिवंत अथवा तिचा मृतदेह हाती न लागल्याचे वरिष्ठ निरीक्षक अजयकुमार लांडगे यांनी सांगितले. बुधवारी सकाळी पोलिसांनी पुन्हा खाडीत शोधमोहीम राबवली मात्र काहीही शोध लागला नाही.
प्राचीचे एप्रिल महिन्यात लग्न झाले असून पती गणेश व सासू-सासऱ्यांसोबत ती घाटकोपरला राहते. कामावरून सुटल्यानंतर उशिरा घरी जाण्यावरून त्यांच्यात वाद व्हायचा. त्यावरून दोन दिवसांपूर्वीच सासरच्यांनी तिच्या आई-वडिलांना घरी बोलावून तिच्या वागण्याची तक्रार केलेली. या कौटुंबिक वादातून तिने आत्महत्या केल्याची शक्यता व्यक्त होत आहे. मंगळवारी खारघर येथील बंदोबस्ताची ड्युटी चार वाजता संपल्यानंतरही ती घरी गेली नव्हती. अखेर रात्री ९.३० वाजता तिने पतीला फोन करून पावसामुळे नेरुळ पुलाखाली थांबली असल्याचे सांगितले होते. त्यानंतर रात्री १०.४५ वाजता तिची स्कुटी खाडीपुलावर आढळली. याप्रकरणी तिच्या बेपत्ता होण्याची तक्रार वाशी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. तर तिचा शोध सुरू असल्याचे वरिष्ठ निरीक्षक अजयकुमार लांडगे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)