नवी मुंबईत महिला राजकारण्यांचा दबदबा; पंचवीस वर्षांमध्ये ४ महिला महापौरपदी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2020 11:49 PM2020-03-07T23:49:55+5:302020-03-07T23:50:40+5:30
दोन वेळा भूषविले स्थायी समितीचे सभापतीपद; १७३ महिलांना मिळाली संधी
नामदेव मोरे
नवी मुंबई : नवी मुंबईच्या राजकारणामध्ये महिलांनीही त्यांचा ठसा उमटविला आहे. २५ वर्षांमध्ये तब्बल १७३ महिला नगरसेविका झाल्या आहेत. चार वेळा महापौर, तीन वेळा उपमहापौर व दोन वेळा तिजोरीची चावी समजल्या जाणाऱ्या स्थायी समितीचे सभापतीपदही महिलांनी भूषविले आहे. तब्बल १० महिलांनी तीन वेळा निवडून येण्याचा विक्रम केला आहे.
महापालिकेच्या स्थापनेपासूनच महिला नगरसेविकांनी त्यांच्या कामाचा ठसा उमटविला आहे. २५ वर्षांच्या वाटचालीमध्ये तब्बल १७३ महिला महापालिकेच्या निवडणुकीमध्ये निवडून आल्या आहेत. पालिकेमधील सर्व महत्त्वाची पदे महिलांनी भूषविली असून शहरहितासाठी अनेक चांगले निर्णय घेतले आहेत. सुषमा दंडे, विजया म्हात्रे यांनी महिलाही महापौरपद प्रभावीपणे सांभाळू शकतात हे दाखवून दिले. त्यांच्यानंतर महापौर झालेल्या मनीषा भोईर व अंजली भोईर यांच्या कार्यकाळात शहरात विकासाचे व्हिजन राबविण्यात आले. स्कूल, व्हिजन, उद्यान व्हिजन, तलाव व्हिजन, रोड व्हिजन अंतर्गत कामे याच काळात सुरू झाली. मोरबे ते दिघा जलवाहिनी, अत्याधुनिक मलनि:सारण केंद्र, शहरात मलनि:सारण वाहिन्यांचे जाळे, ठाणे-बेलापूर रस्त्याचे काँक्रिटीकरण, ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र उभारण्याचे धोरण व देशातील पहिले दिव्यांग शिक्षण, प्रशिक्षण व सेवा-सुविधा केंद्रही याच पाच वर्षांच्या कालावधीमध्ये उभारण्यात आले आहे.
राज्यातील व देशातील बहुतांश महानगरपालिकांमध्येही महापौर, उपमहापौर पदावर महिलांची वर्णी लावली जाते. परंतु महापालिकेच्या तिजोरीची चावी समजल्या जाणाºया स्थायी समितीच्या सभापतीपदावर महिलांची वर्णी लावली जात नाही. नवी मुंबईमध्ये मागील पाच वर्षांमध्ये नेत्रा शिर्के व शुभांगी पाटील यांनी यशस्वीपणे स्थायी समितीचे सभापतीपद भूषविले. आतापर्यंत तीन वेळा उपमहापौरपद महिलांनी भूषविले आहे. विद्यमान उपमहापौर मंदाकिनी म्हात्रे यांचे कामही प्रभावी आहे. येणाºया निवडणुकीमध्येही १११ पैकी ५६ प्रभाग महिलांसाठी आरक्षित आहेत. यामुळे सभागृहात महिला जास्त असणार आहे.
मंदा म्हात्रे सर्वात यशस्वी राजकारणी
नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीमध्ये आतापर्यंत १७३ नगरसेविका निवडून आल्या आहेत. या सर्वांमध्ये मंदा म्हात्रे या सर्वात यशस्वी लोकप्रतिनिधी ठरल्या आहेत. १९९५ च्या पहिल्या निवडणुकीमध्ये नगरसेविका झालेल्या मंदा म्हात्रे यांनी पालिकेत सभापतीपदही भूषविले आहे. एकदा विधान परिषद सदस्या व विधानसभा निवडणुकीमध्ये दोन वेळा बेलापूर मतदारसंघातून विजयी झाल्या आहेत. कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना त्यांनी राजकीय क्षेत्रामध्ये स्वत:चा ठसा उमटविला आहे.
१५ महिलांना दोन वेळा संधी
महापालिकेच्या निवडणुकीमध्ये आतापर्यंत उषा भोईर, कमलताई पाटील, मनीषा भोईर, राधा कुलकर्णी, वंदना सोनावणे, भारती कोळी, विजया ठाकूर, नीलम जगताप, वर्षा नाईक, बेबीताई पाटील, रोहिणी शिंदे, मोनिका पाटील, शुभांगी पाटील, कोमल वास्कर, सरोज पाटील या दोन वेळा निवडून आल्या आहेत.