महिलांनी वाहतुकीचे नियम पाळावेत
By admin | Published: January 18, 2016 02:15 AM2016-01-18T02:15:32+5:302016-01-18T02:15:32+5:30
सध्या सर्वच क्षेत्रांत एक पाऊल पुढे असलेल्या महिलांनी वाहतुकीचे नियम पाळण्यातही अव्वल राहावे, असे आवाहन अभिनेत्री सुप्रिया पिळगावकर यांनी केले.
नवी मुंबई : सध्या सर्वच क्षेत्रांत एक पाऊल पुढे असलेल्या महिलांनी वाहतुकीचे नियम पाळण्यातही अव्वल राहावे, असे आवाहन अभिनेत्री सुप्रिया पिळगावकर यांनी केले. रस्ता सुरक्षा सप्ताहानिमित्त आयोजित महिला मोटारसायकल रॅलीला त्या उपस्थित होत्या. रॅलीच्या माध्यमातून वाहतुकीच्या नियमांबाबात जनजागृती करण्यात आली.
रस्ते अपघात टाळण्यासाठी चालकांकडून वाहतुकीच्या नियमांचे पालन होणे गरजेचे आहे. त्यानुसार सुरू असलेल्या रस्ता सुरक्षा सप्ताहांतर्गत वाशी वाहतूक पोलिसांच्या वतीने महिला मोटारसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सिने अभिनेत्री सुप्रिया पिळगावकर, वाहतूक उपायुक्त अरविंद साळवे, क्रीडापट्टू अभिलाषा म्हात्रे, वाहतूक विभाग वरिष्ठ निरीक्षक शिरीष पवार आदी उपस्थित होते. तर वाशी ते खारघरदरम्यान काढलेल्या या मोटारसायकल रॅलीमध्ये ७० हून अधिक महिलांनी सहभाग घेतला.
वाहनचालकाने वाहतुकीच्या नियमांचे पालन करणे गरजेचे आहे अन्यथा घडलेला किरकोळ अपघात त्याचे अथवा सहप्रवाशाचे प्राण घेऊ शकतो. त्यामुळे सिग्नल लागलेला असताना अवघ्या एक मिनिटासाठी सिग्नल तोडण्याची घाई न करता थांबावे. आपल्यालाही वाहन चालवायची खूप आवड आहे. मात्र हाताच्या दुखण्यामुळे ती पूर्ण करू शकत नाही. परंतु मुलीसोबत जेव्हा कारमधून घराबाहेर जायची वेळ येते तेव्हा दोघीही वाहतुकीच्या नियमांचे पालन करीत असल्याचेही सुप्रिया यांनी सांगितले. सर्वच चालक महिलांनी दक्षता घेऊन वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्यातही आघाडी घ्यावी, अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली. (प्रतिनिधी)