बिरवाडी : महिलांनी रामायण, महाभारत, दासबोध वाचण्या बरोबर माँ जिजाऊंचे चरित्रही वाचावे, शिवरायांच्या चरणी नतमस्तक होणे हाच आपला धर्म आहे, असे सांगून सभागृहाच्या दुरुस्तीची जबाबदारी घेत, या पुढे समाधीस्थळी माझ्या आमदार निधीमधून एक सफाई कर्मचारी ठेवणार असल्याचे आ. भरत गोगावले यांनी जाहीर केले. तसेच विजवीतरण, वनविभाग व पुरातत्त्व विभागाच्या अधिकाऱ्यांचा समाचार घेत शिवरायांसाठी तुम्ही आहात ही जाणीव त्यांना करून दिली.जिल्हा परिषद, महाड पंचायत समिती व पाचाड ग्रामपंचायतीच्या वतीने हा राजमाता जिजाऊंचा ४१९वा जन्मोत्सव पाचाड या जिजाऊंच्या समाधीस्थळी संपन्न झाला. या वेळी आ. भरतशेठ गोगावले यांनी अनुपस्थित लोकप्रतिनिधींचा समाचार घेत या सोहळ्यांना उपस्थितीत राहणे हे प्रत्येक लोकप्रतिनिधीचे कर्तव्य आहे, असे सांगितले. आ. गोगावले यांच्या हस्ते समाधीस्थळावरील जिजाऊंच्या पुतळ्याची पूजा व पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले, तसेच ग्रामस्थांनी जिजाऊंच्या पालखीचे स्वागत केले. या सोहळ्यासाठी ५ लाख हा निधी अपुरा पडत असून येत्या नव्या जिल्हा परिषदेच्या पहिल्या सभेत, सोहळ्यासाठी व सभागृहासाठी वाढीव निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन जिल्हा परिषद उपाध्यक्ष बाळकृष्ण राऊळ यांनी दिले. तसेच रायगड संवर्धनासाठी मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या ५५० कोटी पैकी काही निधी हा बँकेत फिक्स डिपोझीटला ठेवावा जेणेकरून त्या पैशातून हे सोहळे घेता येतील. जिल्हा परिषद विरोधीपक्ष नेते सुरेश कालगुडे यांनी या सभागृहासाठी आपण ८ लाखांच्या निधीची मागणी व मान्यता घेतली असून अधिकाऱ्यांनी या प्रकरणी पाठपुरावा करून अंदाजपत्रक बनविण्याच्या सूचना केल्या. तसेच किल्ले रायगड व जिजाऊ समाधी दुरवस्थेबाबत आक्र मक होत कालगुडे यांनी पुरातत्त्व विभागाला शिवसेना स्टाईल उत्तर देऊ, असा सज्जड इशारा दिला. सभापती दिप्ती फळसकर यांनी शिक्षक, पालक व विद्यार्थ्यांनी राजमाता जिजाऊंचे विचार आत्मसात करावे, असे सांगितले. या वेळी सरपंच राजेंद्र खातू यांनी प्रस्तावना सादर केली. (वार्ताहर)
महिलांनी माँ जिजाऊंचे चरित्र वाचावे
By admin | Published: January 13, 2017 6:13 AM