रेल्वे कॉलनीतील टाकीत महिला पडली
By admin | Published: April 2, 2016 03:01 AM2016-04-02T03:01:47+5:302016-04-02T03:01:47+5:30
जुईनगरमधील रेल्वे कॉलनीतील सांडपाणी साठविण्याच्या टाकीचा स्लॅब कोसळून एक महिला २० फूट खोल गटारात पडली. पायाला गंभीर दुखापत झाली आहे. सुदैवाने सदर महिलेचा
नवी मुंबई : जुईनगरमधील रेल्वे कॉलनीतील सांडपाणी साठविण्याच्या टाकीचा स्लॅब कोसळून एक महिला २० फूट खोल गटारात पडली. पायाला गंभीर दुखापत झाली आहे. सुदैवाने सदर महिलेचा व तिच्या मुलीचा जीव वाचला. रेल्वे प्रशासनाच्या अनागोंदी कारभाराविषयी नागरिकांनी व स्थानिक लोकप्रतिनिधींनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
रेल्वेने सानपाडा कारशेड सुरू केल्यानंतर येथील कर्मचाऱ्यांसाठी जुईनगर सेक्टर २२ मध्ये वसाहत निर्माण केली. या वसाहतीची प्रचंड दुरवस्था झाली आहे. सकाळी येथील रहिवासी मनीषा टोनी दास व ९ वर्षांची मुलगी त्रिषाला क्लासला सोडण्यासाठी जात होत्या. इमारतीच्या समोरील मलनि:सारण वाहिन्यातील पाणी साठवून ठेवण्याच्या टाकीवरून जात असताना टाकीवरील स्लॅब कोसळला. सदर महिलेने प्रसंगावधान राखून मुलीला बाजूला ढकलले. परंतु ती महिला मात्र टाकीमध्ये पडली. २० फूट उंचीच्या टाकीत पडल्याने पायाचे हाड दोन ठिकाणी मोडले आहे. सुदैवाने सदर महिलेचा जीव वाचला आहे. पाण्यामध्ये पूर्णपणे गेल्या असत्या तर जीव गमवावा लागला असता. नागरिकांनी व काँगे्रसचे ठाणे जिल्हा युवक अध्यक्ष निशांत भगत यांनी तत्काळ सदर महिलेला जुईनगरमधील खाजगी रुग्णालयामध्ये दाखल केले आहे. सदर महिलेच्या पायावर शस्त्रक्रिया करावी लागणार आहे. या घटनेमुळे रेल्वे कॉलनीमधील नागरिकांनी प्रशासनाच्या निष्काळजीपणाविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
येथील काँगे्रस नगरसेविका रूपाली भगत व निशांत भगत यांनी रेल्वे कॉलनीतील या अपघाताविषयी चिंता व्यक्त केली आहे. रेल्वे कॉलनीमधील सांडपाणी येथील सेप्टीक टँकमध्ये साठविले जाते. महापालिकेच्या मलनि:सारण वाहिन्यांशी जोडणी करण्यात आलेली नाही. जवळपास २० फूट खोल सेप्टीक टँकमध्ये पाणी सोडले जाते. या टाकीचा स्लॅब कोसळण्याच्या स्थितीमध्ये असूनही रेल्वे प्रशासनाने दुरुस्ती केली नसल्यामुळे आजचा अपघात झाला आहे. सुदैवाने जीवितहानी झाली नाही. (प्रतिनिधी)
रेल्वे कॉलनीतील टाकीत महिला पडून गंभीर जखमी झाली आहे. ही महिला व तिची मुलगी सुदैवाने वाचली. रेल्वे कॉलनीतील डागडुजीची कामे महापालिका करत नाही व रेल्वे प्रशासन लक्ष देत नाही. यामुळे नागरिकांना जीव मुठीत घेवून जगावे लागत आहे. तत्काळ येतील कामे मार्गी लावली नाहीत तर आंदोलन केले जाईल.
- निशांत भगत,
अध्यक्ष, युवक काँगे्रस