पनवेल : राज्यातील २७ महानगरपालिकेतील महापौरपदाच्या आरक्षणाची सोडत शुक्रवारी मंत्रालयात पार पडली. यामध्ये नव्याने स्थापन झालेल्या रायगड जिल्ह्यातील पहिल्या पनवेल महानगरपालिकेचाही समावेश आहे. महापालिकेचे पहिले महापौरपद अनुसूचित जाती महिला उमेदवारांसाठी राखीव ठेवले आहे. आरक्षणामुळे इच्छुक असणाऱ्या दिग्गज नेत्यांना झटका बसला असून, भाजपा व शेकापसह इतर पक्षांनी महापौरपदासाठी उमेदवारांची चाचपणी सुरू केली आहे.अनेक दिवसांपासून पनवेल महापौरपदी कोण विराजमान होणार याची मोठी चर्चा रंगली होती. विशेष म्हणजे या पदासाठी भाजपाचे नेते माजी खासदार यांचे पुत्र परेश ठाकूर, शेकाप नेते जे. एम. म्हात्रेंचे चिरंजीव प्रीतम म्हात्रे, शेकापचे माजी नगराध्यक्ष संदीप पाटील, कामोठे ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच किशोर म्हात्रे आदींची नावे सर्वाधिक चर्चेत होती. याकरिता इच्छुक उमेदवारांनी मोर्चेबांधणीही सुरू केली होती. मात्र आरक्षणामुळे सर्वांच्याच हाती निराशा आली आहे. महापालिकेच्या एकूण १८ प्रभागांपैकी तीन प्रभाग अनुसूचित जाती महिला उमेदवारांसाठी आरक्षित आहेत. यात खारघरमधील प्रभाग ११ व कामोठेमधील प्रभाग ११ व १३ चा समावेश आहे. त्यामुळे सर्वच राजकीय नेत्यांनी अनुसूचित जाती महिला उमेदवाराचा शोध सुरू केला आहे. महापौरपदाच्या आरक्षणामुळे पक्षप्रवेशाला पेव फुटण्याची शक्यता आहे.महापालिका निवडणुकीत शेकाप, काँग्रेस, राष्ट्रवादी, समाजवादी पक्षाची आघाडी झालेली आहे. मनसेदेखील आघाडीत समाविष्ट होण्याची शक्यता आहे.मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत भाजपा व शिवसेनेने वेगवेगळ्या चुली मांडल्या आहेत. त्याचप्रमाणे पनवेलमध्ये देखील युती होणे शक्य नसल्याचे बोलले जात आहे. शिवसेना देखील महाआघाडीत समाविष्ट झाल्यास भाजपासमोर तगडे आव्हान तयार होणार आहे. महाआघाडीतील मतदारांचा कौलच महापौर निश्चित करेल. भाजपाचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडे संपूर्ण जिल्ह्याची धुरा आहे. त्यामुळे जिल्ह्यातील पहिल्या महापालिकेत आपल्याच पक्षाचा महापौर बसावा, याकरिता तेही कसून प्रयत्न करतीलच. (प्रतिनिधी)
महिलाच होणार पनवेलची पहिली महापौर
By admin | Published: February 04, 2017 2:58 AM