पनवेल महापालिकेवर महिलांचा हंडामोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2018 02:14 AM2018-04-17T02:14:44+5:302018-04-17T02:14:44+5:30
पनवेल शहरात मागील आठवड्यापासून भीषण पाणीटंचाई भेडसावत आहे . दिवसाआड पाणीपुरवठ्याच्या नावाखाली केवळ काही मिनिटे शहरात पाणीपुरवठा केला जात आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या महिलांनी सोमवारी महापालिकेवर धडक हंडामोर्चा काढत आयुक्तांच्या दालनाबाहेर घोषणाबाजी केली.
पनवेल : पनवेल शहरात मागील आठवड्यापासून भीषण पाणीटंचाई भेडसावत आहे . दिवसाआड पाणीपुरवठ्याच्या नावाखाली केवळ काही मिनिटे शहरात पाणीपुरवठा केला जात आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या महिलांनी सोमवारी महापालिकेवर धडक हंडामोर्चा काढत आयुक्तांच्या दालनाबाहेर घोषणाबाजी केली.
नवी मुंबई महापालिकेने शहराला दिवसाला ५0 टँकर पाणी देण्याचे जाहीर केले आहे. परंतु पनवेल महापालिकेकडे पुरेसे टँकर नसल्याने मिळणारे पाणीही आणता येत नाही. एकूणच पनवेलकरांना होणाऱ्या पाणीपुरवठ्यात कमालीची कपात करण्यात आली आहे. अत्यंत कमी दाबाने होणाºया पाणीपुरवठ्यामुळे रहिवासी मेटाकुटीला आले आहेत. त्यामुळे महापालिका प्रशासनाच्या विरोधात नागरिकांत असंतोष पसरत आहे. विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी शहरातील पाणीटंचाईला सत्ताधारी जबाबदार असल्याचा आरोप करीत शुक्रवारी पाणीपुरवठा सभापती नीलेश बाविस्कर यांना घेराव घातला होता. या वेळी सत्ताधारी आणि विरोधकांत बाचाबाचीही झाली होती.
पनवेल महानगरपालिकेमधील प्रभाग क्र मांक १९मधील रोहिदास वाडा भागात शुक्र वारी मध्यरात्री पाणी आले होते. त्यानंतर सोमवार सकाळी १0 वाजेपर्यंत पाणी न आल्याने संतप्त महिलांनी सोमवारी हंडामोर्चा काढून आपला निषेध नोंदविला. सुरक्षारक्षकांनी महिलांना अडविण्याचा प्रयत्न केला. पनवेल शहरात पाण्याची समस्या गंभीर होत चालली असून, अद्याप कोणत्याच उपायोजना राबविल्या जात नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे. पनवेल महानगरपालिका हद्दीतून सिडको, एमजेपी, एमआयडीसी आदी ठिकाणच्या जलवाहिन्या गेलेल्या आहेत. मात्र पनवेल शहराला मुबलक पाणीपुरवठा मिळविण्यास प्रशासणासह सत्ताधाºयांना अपयश आले आहे.