परिचितांकडूनच महिलांचा विश्वास‘घात’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 01:13 AM2021-03-10T01:13:05+5:302021-03-10T01:13:15+5:30

नवी मुंबई, पनवेलमधील परिस्थिती : दोन वर्षांत महिला अत्याचाराच्या १०५० घटना

Women's trust 'betrayed' by acquaintances | परिचितांकडूनच महिलांचा विश्वास‘घात’

परिचितांकडूनच महिलांचा विश्वास‘घात’

Next

सूर्यकांत वाघमारे

नवी मुंबई : नवी मुंबईसह पनवेलमध्ये महिला अत्याचाराच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. मागील दोन वर्षांत महिला अत्याचाराच्या १,०५० घटना घडल्या आहेत. त्यात बलात्कार, हुंडाबळी यासह लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या घटनांचाही समावेश आहे. यापैकी बहुतांश गुन्हे हे संबंधित महिला व मुलीच्या परिचयाच्या व्यक्तींकडूनच घडले आहेत. 

गुजरात येथील विवाहितेने सासरच्या जाचाला कंटाळून नदीत आत्महत्या केल्याची घटना नुकतीच घडली. या घटनेच्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमुळे पुन्हा एकदा राज्यभरातील महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. नवी मुंबईतदेखील अशाच त्रासाला कंटाळून महिलांनी आत्महत्या केल्याचे किंवा प्रयत्न केल्याच्या घटना घडल्या आहेत. मात्र, सासरच्या जाचासह समाजातील इतर घटकांकडूनदेखील महिलांवर होणारे अत्याचार तितकेच गंभीर आहेत. मागील दोन वर्षांत नवी मुंबई पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रात महिला अत्याचाराच्या १ हजार ५० घटना घडल्या आहेत. त्यापैकी ४३८ गुन्ह्यांची नोंद मागील वर्षभरात झाली आहे. त्यात विनयभंग व बलात्काराच्या तक्रारी सर्वाधिक आहेत. त्यापैकी बहुतांश गुन्ह्यांची पोलिसांनी उकल केली आहे. या वेळी अत्याचार करणारी व्यक्ती ही महिलेच्या परिचयातीलच असल्याचे तपासात समोर आले आहे. यावरून संबंधितांनी नियोजनबद्धरीत्या महिलेला लक्ष्य केल्याचे दिसून येत आहे. बलात्काराच्या १२५ घटनांमध्ये लग्नाचे आमिष दाखवून ४५ घटना घडल्या आहेत. तर ओळखीच्या व्यक्तींकडून ५८ घटना घडलेल्या असून उर्वरित २२ घटनांमध्ये गुन्हेगार व पीडिता यांची ओळख नसल्याचे समोर आले आहे. विवाहितांवरील अत्याचारांत सासरच्या व्यक्तींचा समावेश असल्याचे वेगवेगळ्या तक्रारींवरून पुढे आले आहे. पती - पत्नीमधील वादातून किंवा सासरच्या जाचाविरोधात महिला साहाय्यता कक्षाकडे वर्षभरात ६३३ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यापैकी १५१ दाम्पत्यांचा पोलिसांच्या मध्यस्थीनंतर काडीमोड टाळला आहे. मात्र, उर्वरित ४८२ दाम्पत्ये एकमेकांपासून विभक्त होण्याच्या निर्णयावर ठाम आहेत. यापैकी बहुतांश तक्रारी ह्या पत्नीवर अविश्वास किंवा सासरच्यांकडून होत असलेल्या छळाबाबत आहेत. त्यामुळे स्मार्ट सिटीतदेखील महिलांच्या मनात घुसमट असल्याने, त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होत आहे. तर अनेक महिला हा होणारा अत्याचार सहन करत संसाराशी तडजोड करीत असल्याचेही दिसून येत आहे. 

बालवयातला प्रेमभंग
तारुण्यात पाय ठेवण्यापूर्वीच अनेक मुलींचे आयुष्य उद्ध्वस्त केले जात आहे. नवी मुंबईसह पनवेल व उरण परिसरातून मोठ्या प्रमाणात अल्पवयीन मुलींना फूस लावून पळविले जात आहे. मागील वर्षभरात अशा ३१ मुलींची राज्याबाहेरून सुटका करण्यात आली आहे. अशा मुलींना श्रीमंतीची किंवा सुखी संसाराची भुरळ घातली जाते.  प्रत्यक्षात मात्र पळवून नेल्यानंतर सातत्याने तिला शारीरिक व मानसिक अत्याचाराला सामोरे जावे लागते. 

संसारात समजूतदारपणा नाही 
nपती - पत्नीमधील वादात अनेकदा पती किंवा सासरच्यांकडून काडीमोड करण्याचा निर्णय घेतला जातो. यामध्ये सर्वाधिक महिला भरडली जाण्याची शक्यता असते. त्यामुळे त्यांचा काडीमोड टाळण्याचा पुरेपूर प्रयत्न पोलिसांकडून होत असतो. 
nमात्र गतवर्षी महिला साहाय्यता कक्षाकडे दाखल झालेल्या एकूण ६३३ तक्रारींपैकी ४८२ तक्रारदार विभक्त होण्याच्या निर्णयावर ठाम आहेत. त्यामुळे या प्रकरणांमधून  महिलांवर अन्यायच होणार असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. 

Web Title: Women's trust 'betrayed' by acquaintances

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.