वंडर्स पार्कमधील आश्चर्यांच्या प्रतिकृतींना आले ‘अच्छे दिन’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2018 12:11 AM2018-10-19T00:11:53+5:302018-10-19T00:12:51+5:30
नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेच्या नेरुळमधील निर्माण केलेल्या वंडर्स पार्कमधील जगातील सात आश्चर्यांच्या प्रतिकृतींची दुरवस्था झाली असून, अनेक ...
नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेच्या नेरुळमधील निर्माण केलेल्या वंडर्स पार्कमधील जगातील सात आश्चर्यांच्या प्रतिकृतींची दुरवस्था झाली असून, अनेक ठिकाणी मोडतोड झाली असल्याची बातमी ‘लोकमत’ने प्रसिद्ध केली होती. या बातमीची दखल घेत प्रशासनाने या सातही प्रतिकृतींच्या दुरु स्तीला सुरु वात केली आहे. त्यामुळे अनेक वर्षांपासून दुरवस्थेत असलेल्या वंडर्स पार्कमधील जगातील सात आश्चर्यांच्या प्रतिकृतींना अच्छे दिन आले आहेत.
शहराच्या आकर्षणात भर घालून शहराचा नावलौकिक वाढविलेल्या नेरुळ सेक्टर-१९ मधील वंडर्स पार्क उद्यानात येणाऱ्या नागरिकांची संख्या वाढली आहे. पार्कच्या सौंदर्यात भर पाडण्यासाठी जगातील सात आश्चर्यांच्या प्रतिकृती बनविण्यात आल्या आहेत. यामध्ये भारतातील ताजमहाल, चीनमधील भिंत, ग्रीकमधील पेट्रा, इटलीमधील रोम शहरातील अंडाकृती आकाराचे खुले थिएटर म्हणजेच कलोसियम, ब्राझीलमधील क्रिस्तो रेदेंतोर, मेक्सिकोमधील चिचेन इस्ता, दक्षिण अमेरिकेमधील मास्कू पिक्तसू, जगातील अशा या सात आश्चर्यांच्या प्रतिकृती बनविण्यात आल्या आहेत. वंडर्स पार्कमध्ये येणारे नागरिक या ठिकाणी लावलेल्या प्रतिकृतींना भेट देतात. २०१२ साली या पार्कचे लोकार्पण करण्यात आले, तेव्हापासून या प्रतिकृतीची डागडुजी करण्यात आली नाही, त्यामुळे या वास्तूंची दुरवस्था झाली होती.
ऊन, पाऊस आणि वारा अशा खुल्या वातावरणात आश्चर्यांच्या प्रतिकृती असल्याने त्यांचा रंग खराब होऊन अनेक ठिकाणी मोडतोडही झाली होती. काही प्रतिकृतींचा पृष्ठभागही उखडला होता. या बाबत ‘लोकमत’ने २२ सप्टेंबर २०१८ रोजी बातमी प्रसिद्ध केली होती. त्यानंतर प्रशासनाने या बातमीची दखल घेत, या प्रतिकृतींच्या दुरु स्तीला सुरु वात केली आहे.