दोन वर्षांपासून रखडले ऐरोली नाट्यगृहाचे काम
By admin | Published: February 23, 2017 06:36 AM2017-02-23T06:36:11+5:302017-02-23T06:36:11+5:30
वाशीतील विष्णुदास भावे नाट्यगृहाच्या धर्तीवर ऐरोलीमध्ये भव्य नाट्यगृह
नामदेव मोरे / नवी मुंबई
वाशीतील विष्णुदास भावे नाट्यगृहाच्या धर्तीवर ऐरोलीमध्ये भव्य नाट्यगृह उभारण्याचा निर्णय महापालिकेने २०१३ मध्ये घेतला. २०१४ मध्ये कामाचे भूमिपूजनही करण्यात आले. परंतु राजकीय वाद व प्रशासकीय उदासीनता यामुळे काम ठप्प झाले असून ऐरोलीकरांमध्ये नाराजी वाढू लागली आहे.
महापालिकेच्या अर्थसंकल्पातील पूर्ण न झालेल्या प्रकल्पामध्ये ऐरोली मधील नाट्यगृहाचा समावेश आहे. वाशीमध्ये मनपाचे विष्णुदास भावे नाट्यगृह आहे. परंतु ऐरोली परिसरातील नागरिकांसाठी हे ठिकाण दूर आहे. यामुळे परिसरातील नागरिकांना नाटक व मनोरंजनाचे कार्यक्रम पाहता येत नाहीत. नागरिकांची ही गैरसोय दूर करण्यासाठी सेक्टर ५ मधील भूखंड क्रमांक ३७ वर नवीन नाट्यगृह उभारण्याचे निश्चित करण्यात आले. १३०४६ चौरस मीटर बांधकाम क्षेत्रफळाच्या भूखंडावर १६ मीटर उंचीचे व ४ मजली नाट्यगृह बांधण्यात येणार होते. यामध्ये तळमजल्यावर तिकीटगृह, रंगीत तालीम कक्ष, पहिल्या मजल्यावर मेकअप रूम, दुसऱ्या मजल्यावर ग्रीनरूम, प्रशासकीय दालन, रंगमंचासह बहुउद्देशीय सभागृह, तिसऱ्या मजल्यावर अधिकारी कक्ष, २ अतिथीगृह, अशी व्यवस्था करण्यात येणार होती. तळघरामध्ये ९४ चारचाकी व ४१ दुचाकी वाहने उभी करण्याचे नियोजन केले होते. महापालिकेने २१ आॅगस्ट २०१४ मध्ये नाट्यगृहाच्या कामाचे भूमिपूजन केले होते. एक वर्षामध्ये हे काम पूर्ण करण्यात येणार होते. परंतु प्रत्यक्षात पायासाठी केलेल्या खोदकामाव्यतिरिक्त काहीही काम झालेले नाही. नाट्यगृहाचे काम मार्गी लावण्यासाठी नगरसेवक एम. के. मढवी यांनी पाठपुरावा केला होता. ते राष्ट्रवादी काँगे्रसमध्ये असताना नाट्यगृहाचे भूमिपूजन झाले होते. पण त्यांनी निवडणुकीमध्ये शिवसेनेत प्रवेश केला. यानंतर नाट्यगृहाचे काम ठप्प झाले. यामुळे राजकीय हस्तक्षेपामुळे काम थांबल्याचे बोलले जात होते. परंतु आयुक्तांनी पदभार स्वीकारल्यापासून प्रशासनामधील राजकीय हस्तक्षेप मोडीत काढला. प्रशासनाच्या कामामध्ये कोणत्याही पक्षाचे नेते हस्तक्षेप करत नाहीत. असे असतानाही ८ महिन्यात नाट्यगृहाचे काम प्रत्यक्षात सुरू झालेले नाही.
च्ऐरोलीमध्ये नाट्यगृहाचे बांधकाम करण्याचा मूळ प्रस्ताव ५४ कोटी रूपयांचा आहे. महापालिकेने बांधकामासाठी लाखो रूपये खर्च केले आहेत. डिसेंबर २०१५ पर्यंत जवळपास ३८ लाख रूपये खर्च झाले आहेत. पण प्रत्यक्षात काम काहीही झालेले नाही. सद्यस्थितीमध्ये काम थांबले असून वेळेत काम पूर्ण न झाल्यामुळे बांधकामाचा खर्च वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पालिकेला हे काम पूर्णत्वास न्यायचे नव्हते तर ते सुरू का केले असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.