नवी मुंबई : बेलापूर येथील महापालिका मुख्यालयाशेजारील बेलापूर जंक्शन येथून वाहनांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असल्याने वाहतूककोंडीची समस्या उद्भवत आहे. या समस्येवर मार्ग काढण्यासाठी उरण मार्गावर उड्डाणपुलाचे काम सुरू करण्यात आले आहे. उड्डाणपुलाच्या कामाला लागत असलेल्या विलंबामुळे वाहतूककोंडीच्या समस्येत भर पडत आहे. उरण रस्त्याची दुरवस्था आणि उड्डाणपुलाचे धिम्या गतीने सुरू असलेले काम यामुळे धुळीचे साम्राज्य पसरले आहे. या मार्गावरील विविध समस्यांमुळे वाहनचालक हैराण झाले आहेत.उरण रस्त्याला लागून नव्याने विकसित होत असलेला उलवे नोड आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ यामुळे महापालिका मुख्यालयाजवळील बेलापूर जंक्शन येथून भविष्यात वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे. पाम बीच मार्गदेखील याच ठिकाणाहून सुरू होतो. या मार्गावरून वाशीकडे ये-जा करणारी वाहने मोठ्या प्रमाणावर आहेत. सायन-पनवेल महामार्गवरून उरण जेएनपीटीकडे जाणाऱ्या रस्त्यावरून मालवाहतूक करणाºया जड-अवजड वाहनांची वर्दळही मोठ्या प्रमाणावर आहे. सीबीडीकडून पाम बीच मार्गाकडे ये-जा करणारी वाहने तसेच सायन-पनवेल महामार्गाकडून उरण-जेएनपीटीच्या दिशेने ये-जा करणारी वाहने यामध्ये प्रचंड वाढ झाली असून, बेलापूर जंक्शन येथे वाहतूककोंडीची समस्या निर्माण होत आहे. भविष्यात वाहनांची वाढणारी गर्दी लक्षात घेता बेलापूर जंक्शन येथे उड्डाणपूल बांधणीचे काम सुरू करण्यात आले आहे.सायन-पनवेल महामार्गावरून उरण जेएनपीटी बंदराकडे ये-जा करणाºया वाहनांसाठी सदर उड्डाणपूल बांधण्यात येत असून, या उड्डाणपुलामुळे जेएनपीटी बंदराकडे जाणारी जड-अवजड वाहने बेलापूर जंक्शन येथील सिग्नलवर न थांबता उड्डाणपुलावरून जेएनपीटी बंदराकडे जाणार आहेत. त्यामुळे वाहतूककोंडीची मोठी समस्या मार्गी लागणार आहे; परंतु अनेक महिन्यांपासून सुरू असलेले उड्डाणपुलाचे काम अद्याप अपूर्ण असून कामासाठी लागणारा विलंब मोठी समस्या बनली आहे. उरण रस्त्याची मोठ्या प्रमाणावर दुरवस्था झाली असून, यामुळे रस्त्यावर धुळीचे साम्राज्य पसरले आहे. उड्डाणपुलाचे काम जलदगतीने पूर्ण करावे, तसेच रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी वाहनचालक करीत आहेत.
बेलापूर जंक्शनजवळील पुलाचे काम धिम्या गतीने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2019 12:18 AM